Indian Army : ‘ती’च्या नेतृत्वाखाली तोफाही धडाडणार; पाच महिला अधिकाऱ्यांची लष्कराकडून नियुक्ती

भारतीय लष्करामध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर मोहोर उमटविणाऱ्या तिने आता तोफखाना रेजिमेंटमध्ये देखील पाऊल ठेवले आहे.
Indian Army
Indian Armysakal
Summary

भारतीय लष्करामध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर मोहोर उमटविणाऱ्या तिने आता तोफखाना रेजिमेंटमध्ये देखील पाऊल ठेवले आहे.

नवी दिल्ली - भारतीय लष्करामध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर मोहोर उमटविणाऱ्या तिने आता तोफखाना रेजिमेंटमध्ये देखील पाऊल ठेवले आहे. भारतीय लष्कराने प्रथमच पाच महिला अधिकाऱ्यांची या रेजिमेंटमध्ये नियुक्ती केली आहे. चेन्नई येथील ‘ऑफिसर ट्रेनिंग अॅकॅडमी’तील (ओटीए) प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांचा या रेजिमेंटमध्ये समावेश करण्यात आला आहे. ले. आकांक्षा, ले. मेहक सैनी, ले. साक्षी दुबे, ले. आदिती यादव आणि ले. पियोस मुदगील अशी या महिला अधिकाऱ्यांची नावे आहेत.

या पाच महिला अधिकाऱ्यांपैकी तिघीजणींची चीनला लागून असलेल्या सीमेवरील युनिटमध्ये नियुक्ती करण्यात आली असून त्यातील दोघीजणी पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवरील तोफखाना युनिटची जबाबदारी सांभाळत आहेत. भारतीय लष्कराने आता धोरणात्मक पातळीवर मोठे बदल करायला सुरूवात केली असून तोफखाना रेजिमेंटमधील महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती हा त्याच प्रक्रियेचा भाग असल्याचे बोलले जाते. तत्पूर्वी सरसेनाध्यक्ष जनरल मनोज पांडे यांनी जानेवारी महिन्यामध्येच तोफखाना विभागामध्ये महिला अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे सूतोवाच केले होते. त्यांच्या याच प्रस्तावाला केंद्र सरकारने नंतर मान्यताही दिली होती.

तोफखाना रेजिमेंटमध्ये २८० युनिटचा समावेश होता. हे युनिट बोफोर्स हॉवित्झर, धनुष, एम-७७७ हॉवित्झर आणि के-९ वज्र यासारख्या तोफा हाताळण्याचे काम करते. या महिला अधिकाऱ्यांना आणखी प्रशिक्षण दिले जाणार असून रॉकेटच्या हाताळणीबरोबरच एसएटीए प्रणालीचे देखील त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. ले. सैनी यांची एसएटीए रेजिमेंट, ले. दुबे आणि ले. यादव यांची फिल्ड रेजिमेंट, ले. मुदगील यांची मीडियम रेजिमेंट आणि ले. आकांक्षा यांची रॉकेट रेजिमेंटमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

रेखा सिंह झाल्या लेफ्टनंट

गलवानमधील संघर्षात हुतात्मा झालेले नायक दीपक सिंह यांच्या पत्नी रेखा सिंह यांची लष्करामध्ये लेफ्टनंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रेखा सिंह यांना पूर्व लडाखमध्ये तैनात करण्यात आले आहे. बिहारच्या सोळाव्या बटालियनच्या नायक सिंह यांना २०२१ मध्ये मरणोत्तर वीर चक्र प्रदान करण्यात आले होते. चेन्नईतील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची लष्करामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

पतीच्या निधनानंतरच मी लष्करामध्ये सहभागी होण्याचे निश्चित केले होते त्यासाठी मी तयारी देखील सुरू केली. आज प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मी लेफ्टनंट बनले आहे. इतर महिलांनाही माझे हेच सांगणे आहे की त्यांना जे वाटते ते त्यांनी बिनधास्तपणे करावे. इतर लोक काय म्हणतील याची चिंता करू नये.

- ले. रेखा सिंह, हुतात्मा नायक सिंह यांच्या पत्नी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com