esakal | भारतीय चित्रपटसृष्टीचा तब्बल 8 हजार मिनिटांचा मौखिक इतिहास आता ऑनलाइन उपलब्ध

बोलून बातमी शोधा

भारतीय चित्रपटसृष्टीचा तब्बल 8 हजार मिनिटांचा मौखिक इतिहास आता ऑनलाइन उपलब्ध

भारतीय चित्रपटसृष्टीचा तब्बल 8 हजार मिनिटांचा मौखिक इतिहास आता ऑनलाइन उपलब्ध

sakal_logo
By
मीनाक्षी गुरव

पुणे : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने भारतीय चित्रपटसृष्टीच्या मौखिक इतिहासाचा मोठा खजिना चित्रपट रसिकांसाठी खुला केला आहे.  भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर कलावंतांच्या प्रत्यक्ष मुलाखतींवर आधारित सुमारे आठ हजार मिनिटांचा मौखिक इतिहास चित्रपट संग्रहालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे.

मूकपटापासून ते अलीकडच्या चित्रपटसृष्टीतील असंख्य मान्यवर अभिनेते, तंत्रज्ञ, निर्माते, दिग्दर्शक, स्टुडिओ-मालक यांच्या अद्भुत इतिहास आता ऐकता येणार आहे. मौखिक इतिहास प्रकल्पाअंतर्गत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या संशोधन कार्यक्रमानुसार प्रामुख्याने १९८० मध्ये कलावंतांच्या मुलाखती ध्वनिमुद्रित केल्या आहेत.

हेही वाचा: मराठीतून माहिती तंत्रज्ञानाची देवघेव होणार सोपी; MKCL चं ‘आय.टी.त मराठी’ ॲप विकसित

चित्रपट संग्रहालयाच्या संकेतस्थळावर सुमारे आठ हजार मिनिटांच्या ध्वनिचित्र फितीमध्ये एकूण ५३ कलावंतांच्या मुलाखती आहेत. या मुलाखती मराठी, तमिळ, तेलगू, बंगाली आणि इंग्रजी भाषेत आहेत. जे.बी.एच. वाडिया, अक्कीनेनी नागेश्वरराव, विजय भट्ट, पी. भानुमती, एस. डी. सुब्बुलक्ष्मी, चंद्रकांत गोखले, निळू फुले, शरद तळवलकर, अशा दिग्गजांच्या मुलाखती आहेत. यात सर्वात मोठी म्हणजे तब्बल ५८४ मिनिटांची मुलाखत सौमित्र चॅटर्जी यांची आहे. त्यांची ही मुलाखत अनसूया रॉय चौधरी यांनी घेतली आहे. दादासाहेब फाळके यांच्या अनेक जुन्या सहकाऱ्यांच्या घेतलेल्या मुलाखती हे प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे. तसेच देशातील पहिल्या बालकलाकार म्हणून नावाजलेल्या दादासाहेब फाळके यांच्या कन्या मंदाकिनी फाळके-आठवले यांची मुलाखत हेही या प्रकल्पाचे अनोखे आकर्षण आहे, अशी माहिती संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली.

भारतीय चित्रपटसृष्टीचा मौखिक इतिहास प्रकल्पाचे टप्पे :

  • - प्रकल्पाचे काम १९८३ मध्ये झाले सुरु

  • - सुरुवातीला ध्वनिफितीच्या साहाय्याने कलावंतांच्या मुलाखती घेतल्या

  • -२००८ मध्ये प्रकल्पाचे रूपांतर ध्वनी-चित्र फितीत केले.

  • - मुलाखतीत चित्रपटांचे फोटो, पोस्टर्स, क्लिपिंग्स टाकून त्या अधिक माहितीपूर्ण आणि विस्तृत केल्या

  • - १९८० ते १९९० दरम्यान चित्रपट अभ्यासकांनी संबंधित कलावंतांच्या घरी जाऊन मुलाखती घेतल्या

  • - बापू वाटवे यांनी प्रामुख्याने मराठीतील मुलाखती घेतल्या

  • - चित्रपट अभ्यासक आणि लेखक रॅन्डॉर गाय यांनी तमिळ, तेलगू आणि इंग्रजीमध्ये मुलाखती घेतल्या

  • - ‘https://nfai.gov.in/audio_interview.php’ या संकेतस्थळावर मुलाखती ऐकता येतील.