Vintage Cannons : हुगळी नदीकाठी सापडल्या जुन्या तोफा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vintage Cannons

Vintage Cannons : हुगळी नदीकाठी सापडल्या जुन्या तोफा

कोलकता : भारतीय नौदलाला प.बंगालमध्ये जमीन साफ करताना हुगळी नदीच्या किनाऱ्यावर जुन्या काळातील पाच तोफा सापडल्या. नौदलाला कोलकत्याच्या किनाऱ्यावर या तोफा सापडल्या असून त्या पहिल्या महायुद्धाच्या काळातील असण्याची शक्यता आहे, असा अंदाज नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने वर्तविला.

कॅप्टन जोयदीप चक्रवर्ती यांनी सांगितले, की हुगळी नदीच्या किनाऱ्यावर जमीन साफ करताना या तोफा आढळल्या. पाचपैकी चार तोफा २०२१ च्या मध्यात पूर्वी नदीचाच भाग असलेल्या जमिनीत सापडल्या. शेवटची तोफ जमिनीतून काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. यापैकी दोन तोफा सजवून त्या काळ्या, पांढऱ्या आणि लाल रंगात रंगविल्या आहेत. नौदलाचे बंगालमधील मुख्यालय असलेल्या आयएनएस नेताजी सुभाषमध्ये त्या ठेवण्यात आल्या आहेत. या तोफा पहिल्या महायुद्धातील असल्याचा अंदाज असून जहाजांवर ठेवण्यासाठी त्यांची निर्मिती करण्यात आली असावी, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, की किडरपोक्स डॉक्सजवळील दाईघाट येथील तोफा सापडलेली जमीन एकेकाळी कोलकता बंदराच्या मालकीची होती.नौदलाने सुविधांची उभारणी करण्यासाठी ती ताब्यात घेतली. तण व गवत असलेली ही जमीन कामगाराकडून साफ केली जात होती. त्यावेळी, एका कामगाराची कुदळ धातूसारख्या वस्तूवर आदळून आवाज आला. ही जागा अधिक खोदली असतान तोफ सापडली. त्यानंतर, परिसरात अधिक खोदकाम केले असताना आणखी चार तोफा सापडल्या, असेही त्यांनी नमूद केले.

या पाच तोफांपैकी चार तोफा नौदल मुख्यालयात आणण्यात आल्या. त्यापैकी दोन तोफा सजवून, रंगविल्या आहेत. उर्वरित तोफाही रंगवून नौदलाच्या इतर कार्यालयात ठेवल्या जातील. या तोफांवर निर्मितीबद्दलचा कोणताही मजकूर लिहिलेला नाही. त्यामुळे, त्यांची निर्मिती कधी झाली, याबद्दल अंदाज वर्तविणे अवघड आहे. ब्रिटिश युद्धनौकांसाठी तोफांची निर्मिती करण्यात आली असावी.

- कमांडर सुदिप्तो मोईत्रा, प्रवक्ते, नौदल, प.बंगाल