
Indian Railway : रेल्वे प्रशासनही झालं 'पीके'? थेट भगवान हनुमानालाच पाठवली नोटीस अन्...
नवी दिल्ली - काही दिवसांपूर्वी अभिनेता आमिर खानचा पीके नावाचा एक चित्रपट आला होता. त्यात पर ग्रहावरून आलेला एक व्यक्ती देव हरवल्याचे पोस्टर लावत होता. तसेच देवाला नवस बोलून त्याला हवी असलेली गोष्ट मागत होता. त्यामुळे त्याला सर्व पीके म्हणू लागले. मात्र अशीच काही घटना मध्य प्रदेशात घडली असून येथे 'पीके'ने नव्हे तर रेल्वे प्रशासनाने थेट हनुमानाला नोटीस पाठवली आहे. Indian Railway news in Marathi
मध्यप्रदेशातील मरैनामध्ये रेल्वे प्रशासनाने मंदिरात विराजमान असलेल्या भगवान हनुमानाला नोटीस पाठवली. अजब बाब म्हणजे, रेल्वे प्रशासनाने हनुमानालाच अतिक्रमण करण्यासाठी कारणीभूत ठरवत सात दिवसाच्या आत अतिक्रमण हटविण्यास सांगितलं आहे. तसेच अतिक्रमण न हटवल्यास रेल्वेकडून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. शिवाय कारवाईसाठी करण्यात येणारा खर्च देखील हनुमानाकडून वसूल केला जाईल, असंही सांगितलं.
सध्या ग्वालियर-श्योपूर ब्रॉडगेजचं काम सुरू आहे. मुरैना येथील सलबगढ तालुक्यात हनुमानाचं मंदिर ब्रॉडगेज लाईनच्या मधोमध आलं आहे. तसेच मंदिर ज्या जागेवर आहे, ती जागा रेल्वे प्रशासनाची असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वेने थेट हनुमानालाच नोटीस पाठवली आहे. ही नोटीस मंदिरात पाठविण्यात आली आहे.

हनुमानाला पाठविण्यात आलेल्या नोटीसची एक प्रत ग्वालियरचे मंडळ अभियंते आणि जीआरपी पोलिस स्टेशन प्रभारी यांना देखील पाठविण्यात आली आहे. ही नोटीस सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या नोटीसबाबत रेल्वे प्रशासनाचे जनसंपर्क अधिकारी मनोज माथूर यांनी सांगितलं की, रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठीची ही सामान्य प्रक्रिया आहे.