
नवी दिल्ली : ‘‘पाकिस्तानचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारला असला तरी पुढील घडामोडींवर आमचे लक्ष आहे. पाकिस्तानकडून आगळीक झालीच तर त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचे स्वातंत्र्य आम्हाला आहे,’’ असे भारताच्या लष्करी कारवाई विभागाचे (डीजीएमओ) महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले. मागील काही दिवसांत सीमेवर पाकिस्तानच्या ३५ ते ४० सैनिकांना ठार मारल्याचेही त्यांनी नमूद केले. भारत आणि पाकिस्तानच्या ‘डीजीएमओं’ची सोमवारी दुपारी बारा वाजता बैठक होत आहे, या पार्श्वभूमीवर तिन्ही सैन्य दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज पत्रकारांना कारवाईची माहिती दिली.