Breaking- भारत-चीन सैनिकांमध्ये पुन्हा झटापट; 20 सैनिक जखमी झाल्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 25 January 2021

भारत-चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा संघर्ष झाल्याची माहिती मिळत आहे.

नवी दिल्ली- भारत-चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा संघर्ष झाल्याची माहिती मिळत आहे. उत्तर सिक्किमच्या नाकू ला सेक्टरमध्ये ही झटापट झाल्याचे सांगितलं जात आहे. या संघर्षामध्ये दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. प्रजासत्ताक दिनाला एक दिवस राहिला असताना हा संघर्ष झाल्याने चिंता वाढली आहे.

'संपूर्ण देश तुम्हाला धन्यवाद देईल'; शेतकऱ्याचे PM मोदींच्या आईला...

पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव असताना सिक्किममध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापटी झाली आहे. माध्यमातील माहितीनुसार, उत्तर सिक्किमच्या नाकू ला सेक्टरमध्ये तीन दिवसांपूर्वी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी भारताने चोख प्रत्युत्तर देत त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. उभय देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या झडपेत दोन्ही देशांचे जवान जखमी झाल्याचे कळत आहे. 

मागील आठवड्यात उत्तर सिक्किमच्या नाकू ला सेक्टरमध्ये चिनी सैनिकांनी भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पण, भारतीय सैनिकांनी हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. दोन्ही देशांच्या झटापटीत चीनचे जवळपास 20 सैनिक जखमी झाल्याची माहिती आहे, तर भारताचे 4 सैनिक जखमी झाले आहेत. 

अर्णब गोस्वामींनी TRP साठी 40 लाख आणि सहलीसाठी 12 हजार डॉलर दिले, बार्कच्या...

भारतीय सैनिक उत्तर सिक्किमच्या प्रतिकुल परिस्थितीतही चिनी सैनिकांना मागे खदडण्यात यशस्वी झाले. असे असले तरी याठिकाणी तणाव कायम आहे, पण सध्या स्थिती स्थिर आहे. भारत-आणि चीनमध्ये तणाव निवळ्यासाठी दोन्ही देशांमध्ये नववी चर्चेची फेरी नुकतीच पार पडली आहे. यावेळी सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जाते. असे असताना ही झटापट घडून आली आहे. त्यामुळे तणाव आणखी वाढण्याची स्थिती आहे. 

भारत-चीन सैनिकांमधील झटापटीच्या माध्यमातील बातमीनंतर भारतीय लष्कराने यावर भाष्य केलं आहे. भारतीय लष्कर आणि चीनच्या पीएलएमध्ये छोटी झटापट झाली. नाकू ला येथे 20 जानेवारीला सैन्य आमनेसामने आले होते. प्रोटोकॉलनुसार वाद स्थानिक कमांडर स्तरावर सोडवण्यात आला आहे, असं लष्कराकडून सांगण्यात आले आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

दरम्यान, मागील वर्षी उत्तर सिक्किमच्या नाकू ला सेक्टरमध्येच उभय देशांमध्ये झडप झाली होती. या संघर्षात दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाले होते. सैन्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही देशांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. पण, चर्चेनंतर वाद काहीप्रमाणात निवळला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indo China troops clash again 20 soldiers likely to be injured