भारतातील कोरोनाची स्थिती पाहून इस्त्राईल आला मदतीला; वाचा सविस्तर

कार्तिक पुजारी
गुरुवार, 23 जुलै 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मित्र इस्त्राईल मदतीला धावून आला आहे. इस्त्राईलच्या शास्त्रज्ञांचा एक गट पुढच्या आठवड्यात भारतात येत आहे

नवी दिल्ली- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मित्र इस्त्राईल मदतीला धावून आला आहे. इस्त्राईलच्या शास्त्रज्ञांचा एक गट पुढच्या आठवड्यात भारतात येत आहे. कोरोना विषाणूच्या प्रसाराला कारणीभूत ठरणाऱ्या SARS-CoV-2 रोगजनकाची उपस्थिती शोधण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या चार नविन तंत्रज्ञानाला अंतिम रुप देण्यासाठी ते भारतीय शास्त्रज्ञांसोबत सहयोग करणार आहेत. यामध्ये लाळेच्या नमुन्याद्वारे काही मिनिटात  कोविड-१९ चा अहवाल देण्याच्या दोन पद्धती, एखाद्या व्यक्तीचा केवळ आवाज ऐकून त्याला कोरोना झाला आहे का नाही हे ठरवणे आणि रेडियो लहरीद्वारे विषाणूची उपस्थिती शोधून काढणे यांचा समावेश आहे.
  
पेशंटला मोकळी हवा पाहिजे म्हणून नातेवाइकांनी ICU तून बाहेर आणलं आणि...
इस्त्राईलचे शास्त्रज्ञ भारताच्या एआयआयएमएसच्या संशोधकांसोबत दिल्लीमध्ये काम करणार आहेत. या चार तंत्रज्ञानाची पहिल्या टप्प्यातील चाचणी इस्त्राईलमध्ये पार पडली आहे. आता चाचणीचा शेवटचा टप्पा भारतात पार पाडला जाईल, असं इस्त्राईलचे भारतातील राजदूत रोन माल्कीन म्हणाले आहेत.

पहिले तंत्रज्ञान हे नवीन कोविड चाचणीची पद्धत आहे. यात ३० मिनिटात कोविड-१९ चा अहवाल येण्यासाठी पॉलिमिनो अॅसिडचा वापर केला जातो, असं संरक्षण संशोधन आणि विकास संचालनयाचे प्रमुख डॅनी गोल्ड म्हणाले आहेत. या नवीन कोविड पद्धतीमुळे विमानतळ, शॉपिंग मॉल किंवा इतर ठिकाणी अवघ्या काही मिनिटात कोरोनाचे रुग्ण कळणे सोपे जाईल. त्यामुळे पुन्हा अर्थव्यवस्था सुरु करण्यासाठी याचा मोठा फायदा होईल. दुसरे तंत्रज्ञान अतिशय स्वस्त असून आपण घरीही याचा वापर करुन शकतो. दोन्ही पद्धतीमध्ये लाळेच्या नमुन्याचा वापर केला जातो आणि अवघ्या ३० मिनिटात आपल्याला अहवाल कळतो, अशी माहिती त्यांनी दिली.

निजामाच्या खजिन्याबाबत लंडन न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
तिसरे तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता वापरते. याद्वारे व्यक्तीच्या केवळ आवाजाद्वारे त्याला कोरोनाची लागण झाली आहे का नाही हे कळून येते. कोरोना विषाणू हा आपल्या श्वसनयंत्रणेवर हल्ला चढवतो. एखाद्या सेलफोनद्वारेही याचे निदान केले जाऊ शकते, असं गोल्ड यांनी सांगितलं आहे.

चौथी पद्धत ही श्वास विश्लेषकाची आहे. यात एका ट्युबमध्ये श्वासोच्छ्वास घेतला जातो. त्यानंतर ही ट्युब एका यंत्रामध्ये ठेवली जाते, ज्यात टेराहर्ट्झ रेडिओ फ्रिक्वेन्सी येत असतात. यातील अल्होरिदमद्वारे विषाणूचे अस्तित्व समजू शकत असल्याची माहिती गोल्ड यांनी दिली. इस्त्राईल-भारतचा हा प्रकल्प गोल्ड आणि के. विजयराघवन नेतृत्व करत आहेत. दोन्ही देशातील शास्त्रज्ञांचा गट मिळून प्रत्येक तंत्रज्ञानाच्या ४ ते ५ हजार चाचण्या घेणार आहेत. त्याद्वारे त्याची उपयुक्तता तपासली जाणार आहे. 

भारताने हजारो इस्त्राईली नागरिकांना दुसऱ्या देशातून बाहेर काढले आहे. तसेच कोरोना उद्रेकाच्या काळात आम्हाला वैद्यकीय मदत केली आहे. त्यामुळे आमची ही मदत दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आहे, असं माल्किन म्हणाले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांनी तीनवेळा दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indo-Israel teams to finalise breakthrough Covid tech