
बांगलादेशींच्या घुसखोरीला ‘बीएसएफ’कडून वेसण!
नवी दिल्ली : भारत-बांगलादेश सीमेवरून देशात होणारी घुसखोरी हा सीमा सुरक्षा दलासाठी नेहमीच डोकेदुखीचा विषय ठरला आहे. परंतु जवानांनी देशात बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्या नागरिकांना वेळोवेळी रोखले आहे आणि मायदेशात पाठवले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या एका अहवालात एक जानेवारी २०१९ ते २८ एप्रिल २०२२ या तीन वर्षाच्या काळात किमान पाच हजार बांगलादेशी नागरिकांना भारतात घुसखोरी करण्यापासून रोखल्याचे म्हटले आहे. एक जानेवारी २०१९ ते २८ एप्रिल २०२२ पर्यंत बांगलादेशच्या सीमेवर भारतात बेकायदा वास्तव्य करणारे आणि त्यानंतर मायदेशी परतणाऱ्या ९२३३ बांगलादेशींना अटक करण्यात आली.
त्याचवेळी बेकायदा मार्गाने भारतात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या ४८९६ बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले. यानुसार एकूण १४ हजार ३६१ जणांना ताब्यात घेण्यात आले. सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ८० टक्के निर्वासित बांगलादेशी हे भारतात येण्यासाठी किंवा परत जाण्यासाठी कुंपण नसलेल्या ठिकाणांचा किंवा नदीच्या किनाऱ्याचा आधार घेतात. दक्षिण बंगालची सीमा ही सुंदरबन ते माल्डा आहे.
४०९६ किलोमीटरची सीमा
भारत आणि बांगलादेश यांच्यात ४०९६ किलोमीटरची सीमा आहे. यात दक्षिण बंगालच्या भागात ९१३.३२ किलोमीटरची सीमा असून त्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक सीमेवर कुंपण नाही किंवा सीमाभाग नदीकाठालगत आहे. काही भागात खेडी असून अशावेळी सुरक्षा दलाला घुसखोरांचा शोध घेणे कठीण जाते. गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्याने म्हटले की, घुसखोरीच्या समस्येचा निपटारा करण्यासाठी भूमिकेत बदल केला. त्यानुसार कोणत्याही कुरापतीत सहभागी नसलेले, त्यांच्या नागरिकत्वाची खातरजमा झालेली असेल आणि घुसखोरी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतरही त्यांच्याशी सौजन्याने व्यवहार करून त्यांना बॉर्डर गार्ड बांगलादेश (बीजीबी) यांना सोपवावे, अशा सूचना सुरक्षा दलाला देण्यात आल्या आहेत.
उपजीविकेसाठी भारतात घुसखोरी
बेकायदापणे भारतात घुसखोरी करणारे बहुतांश बांगलादेशी नागरिक हे पोट देश भरण्यासाठी येतात. डिसेंबर २०१९ मध्ये नागरिक दुरुस्ती कायद्याला मंजुरी दिल्यानंतर बेकायदा निर्वासितांची संख्या वाढली आहे. २०२० मध्ये १२१४ नागरिकांनी भारतात घुसण्याचा प्रयत्न केला तर ३४६३ जणांनी भारतातून पलायन केले.