esakal | काँग्रेसमधील अस्वस्थता: प्रभारी नेत्यांचे राजीनाम्याचे प्रस्ताव
sakal

बोलून बातमी शोधा

congress

बिहारमध्ये ७० पैकी अवघ्या १९ जागांवर काँग्रेसला विजय मिळवता आला. बिहारमध्ये रणदीप सुरजेवाला हे पक्षाच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळत होते. गुजरातमध्ये पोटनिवडणुकीत आठही जागांवर काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता.

काँग्रेसमधील अस्वस्थता: प्रभारी नेत्यांचे राजीनाम्याचे प्रस्ताव

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसमध्ये आत्मपरीक्षणाचे सल्ले पक्षातील नेत्यांकडून देण्यात येत आहेत. तर दुसरीकडे, बिहारसोबतच अन्य राज्यांच्या पोटनिवडणुकांमधील पराभवाची जबाबदारी स्वीकारून प्रभारी नेत्यांनी राजीनामे देऊ केले. मात्र काँग्रेस नेतृत्वाने ते  फेटाळल्याचे कळते.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी नेमलेल्या नेत्यांच्या समितीची काल बैठक झाली होती. संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांच्यासह या समितीमध्ये ए. के. अँटनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, मुकुल वासनिक या नेत्यांचाही समावेश असला तरी अँटनी आणि अहमद पटेल हे आजारपणामुळे बैठकीत सहभागी झाले नव्हते. निवडणूक झालेल्या बिहारचे प्रभारी शक्तिसिंह गोहिल तसेच, गुजरातचे प्रभारी राजीव सातव, नागालँडचे प्रभारी भक्तचरण दास बैठकीला उपस्थित होते. यातील गोहिल आणि सातव यांनी निवडणुकीत काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीची जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविल्याचे सूत्रांनी सांगितले. अन्य प्रभारींकडून असा कोणताही प्रस्ताव नसल्याचेही समजले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बिहारमध्ये ७० पैकी अवघ्या १९ जागांवर काँग्रेसला विजय मिळवता आला. बिहारमध्ये रणदीप सुरजेवाला हे पक्षाच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळत होते. गुजरातमध्ये पोटनिवडणुकीत आठही जागांवर काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता. मध्य प्रदेशात सरकार गमावल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला २८ पैकी अवघ्या ९ जागा कशाबशा जिंकता आल्या. मुकुल वासनिक हे मध्यप्रदेशचे प्रभारी आहेत.  

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कपिल सिब्बल यांनी या पराभवानंतर काँग्रेसवर मतदारांचा विश्वास नसल्याचे केलेले परखड भाष्य, चिदंबरम यांच्यासारख्या नेत्यांनीही आत्मपरीक्षणाचा दिलेला सल्ला या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीबाबत काँग्रेस पक्षाकडून औपचारिकपणे काहीही सांगण्यात आले नसले तरी, राजीनाम्याच्या प्रस्तावांबाबत बैठकीतील नेत्यांनी बोलण्याचे टाळले. एवढेच नव्हे तर नेत्यांची ही समिती राजीनाम्याचे व्यासपीठ नसून अशा प्रस्तावांऐवजी पराभवाच्या कारणांवर बोलावे असेही प्रभारींना सांगण्यात आल्याचे कळते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा