
इराणींची वायनाडला धडक
नवी दिल्ली / तिरुअनंतपुरम - केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी वायनाडमध्ये धडकल्या आहेत. राहुल गांधी यांच्या मतदारसंघातील विकास कामांचा आढावा घेण्याचा त्यांचा उद्देश आहे, मात्र यावरून राजकीय वर्तुळात चर्चा झडत आहे.
स्मृती यांचा दौरा दोन दिवसांचा आहे. अलीकडेच राहुल नेपाळमध्ये एका पार्टीत रमल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावरून काँग्रेस आणि भाजप यांच्यात शब्दयुद्ध झाले होते. त्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. केंद्राच्या आकांक्षी जिल्हा योजनेच्या अंमलबजावणीचा त्या आढावा घेणार आहेत.
भाजपला अनेक राज्यांत सत्ता मिळविता आली असली तरी केरळमध्ये स्थिरावता आलेले नाही. स्थानिक नेत्यांना सामावून राजकारणात जम बसविण्याचे त्यांचे प्रयत्नही अपयशी ठरले आहेत. अशावेळी स्मृती इराणी यांच्या रूपाने केंद्रातील एक लोकप्रिय नेत्याला पाठविण्यामागे नव्याने प्रयत्न केले जात आहेत. त्याचे काय परिणाम होतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे.
योजनांबाबत आढावा
एकीकडे राहुल पार्टी करण्यात मश्गूल असताना त्यांच्या मतदारसंघात स्मृती इराणी विकास कामांचा आढावा घेत आहेत असा प्रचार भाजप नेत्यांनी सुरु केला आहे. वायनाडमध्ये स्मृती इराणी यांनी केंद्राच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. त्यांनी एका अंगणवाडी केंद्रालाही भेट दिली. या दौऱ्यात त्या आदिवासी वसाहतींना भेट देणार आहेत तसेच भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
Web Title: Iranian Hit Wayanad Discussion On Rahul Constituency Tour
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..