जागतिक आशा निर्देशांकात आयर्लंड अव्वल भारत 84 व्या क्रमांकावर; येमेन अखेरच्या स्थानावर 

वृत्तसंस्था
बुधवार, 6 जून 2018

जागतिक आशा निर्देशांक यादीतील प्रमुख देश 
क्रमांक : देश : गुण 
1. आयर्लंड : 0.727 
7. सिंगापूर : 0.691 
17. अमेरिका : 0.651 
24. जपान : 0.626 
44. भूतान : 0.564 
53. चीन : 0.531 
75. श्रीलंका : 0.485 
84. भारत : 0.468 
127. पाकिस्तान : 0.305 

नवी दिल्ली - आरोग्य, शिक्षणासारख्या मूलभूत बाबींबरोबरच एखाद्या देशाने सकारात्मक विचार करत विकासाची अथवा बदलाची आशा धरल्यास होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी जागतिक आशा निर्देशांक काढण्यास सुरवात करण्यात आली आहे. केवळ एखाद्याच क्षेत्रातील अभ्यासावरून क्रमवारी काढण्याऐवजी तुलनात्मक बदलांचा अभ्यास करून राहुल वासलेकर यांनी ही नवी यादी तयार केली आहे. या यादीत भारत 84 व्या स्थानावर असल्याने देशाला विकासाची आशा असली तरी अद्यापही बरीच मजल गाठायची असल्याचे दिसून येत आहे. 

उद्देश 
दहशतवाद, स्थलांतर आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे जगभरात सर्वत्र नकारात्मक वातावरण निर्माण होत असताना लोकांमध्ये आशेचा किरण कायम राहावा, या उद्देशाने जागतिक आशा निर्देशांकची सुरवात करण्यात आली आहे. हा निर्देशांक ठरविण्यासाठी जगभरातील 131 देशांमध्ये सर्वेक्षण घेण्यात आले. आशेमुळे एखाद्या देशाच्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीत बदल घडून येतो का?, हे तपासण्यासाठी हे सर्वेक्षण केले गेले. 

आशेची व्याख्या 
एखादी सकारात्मक गोष्ट घडावी, अशी अपेक्षा करणे म्हणजे आशा अशी सर्वसामान्य व्याख्या आहे. ही वैयक्तिक बाब असली तरी सर्वेक्षण करताना ती सामाजिक बाब म्हणून ध्यानात घेतली गेली. 

काय तपासले? 
आपत्तीमध्ये आशा कायम ठेवल्याने समाजामध्ये काय आणि किती बदल झाला, नागरिकांचे बदललेले जीवनमान आणि आर्थिक स्थिती याची छाननी या वेळी घेण्यात आली. तसेच, गेल्या काही वर्षांमधील सामाजिक व इतर बदल, जागतिक बॅंकेसारख्या संस्थांनी गोळा केलेली माहिती यांचा अभ्यास करण्यात आला. प्रत्यक्ष आकडेवारीपेक्षा तुलनात्मक बदलावर भर देण्यात आला. तसेच, एखाद्या देशाने संशोधनासाठी काय केले, शिक्षणक्षेत्रातील प्रगती, नागरिकांना पाणी आणि विजेसारख्या सुविधा देण्यासाठीचे प्रयत्न, राजकीय स्थैर्य यांचाही अभ्यास केला गेला. 

निष्कर्ष 
एखाद्या देशातील दीर्घकालीन अथवा अल्पकालीन बदलाचा किती प्रभाव पडतो, याचा अंदाज या निर्देशांकामुळे येतो. आरोग्य, शिक्षण आणि उत्पन्न या बाबींपलीकडे राजकारण, संशोधन यांच्याकडे पाहण्याची गरज असली तरी या मूळ बाबींशिवाय देशाला कोणत्याही बाबतीत आशा ठेवता येणार नाही, असा सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे. 

जागतिक आशा निर्देशांक यादीतील प्रमुख देश 
क्रमांक : देश : गुण 
1. आयर्लंड : 0.727 
7. सिंगापूर : 0.691 
17. अमेरिका : 0.651 
24. जपान : 0.626 
44. भूतान : 0.564 
53. चीन : 0.531 
75. श्रीलंका : 0.485 
84. भारत : 0.468 
127. पाकिस्तान : 0.305 

Web Title: Ireland tops India at 84th in world hope index; Yemen at the last position