Sex Toys Crime : भारतात सेक्स टॉईज विकत घेणे गुन्हा आहे का? FAQ

crime news
crime news sakal

काही दिवसांपूर्वी पुण्यात काही अवैध सेक्स टॉय जप्त करण्यात आले होते. जवळपास १० लाखांचे टॉय पोलिसांनी जप्त केले होते. त्यानंतर पुण्यातील पोरांना सेक्स टॉयचे वेड लागलेय का? असे प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर आल्या कायदेशीर बाबी. पण भारतात सेक्स टॉयज् विकत घेणे गुन्हा आहे का? सेक्स टॉय म्हणजे काय जाणून घ्या...

1. सेक्स टॉय म्हणजे काय. ते फक्त महिलांसाठीच असतात का?

संभोग सुख किंवा इतर लैंगिक आनंदासाठीच्या वस्तू म्हणजे सेक्स टॉईज. सेक्स टॉईज हे स्त्री, पुरुष आणि इतर लैंगिक परिभाषांच्या व्यक्ती एकट्याने किंवा साथीदारासोबत वापरतील या उद्देशाने किंवा त्यांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन बनविले जातात. सध्या बाजारात विविध कंपन्यांची, संशोधन करून उत्पादित केलेली नावीन्यपूर्ण, पेटंटेड सेक्स टॉईज उपलब्ध आहेत.

२. भारतात सेक्स टॉयबाबत कायदा काय सांगतो?

बऱ्याच देशांमधे या उत्पादनांच्या खरेदी-विक्रीवर कायद्याने बंदी आहे तर बऱ्याच देशांमधे यास मान्यता आहे. भारतात सेक्स टॉइजची अशी विधिवत संज्ञा नाही. काही कायद्यांमधे तसेच सर्वोच्च न्यायालयातील काही निवाड्यांच्या आधारे सेक्स टॉईजच्या कायदेशीर वैधतेबाबत अंदाज बांधता येतो. या उत्पादनांची सांविधानिक वैधता ठरविताना प्रामुख्याने, जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा संविधानिक मूलभूत हक्क, नैतिकता, अश्लीलता आणि शारीरिक संबंधांबाबत गोपनीयतेबाबतीतील हक्क या संज्ञा कायद्याच्या दृष्टिकोनातून अभ्यासायला हव्यात.

नैतिकता ठरविणे हा व्यक्तिगत मुद्दा नसतो. संविधानिक तरतुदींनुसार समाजासाठी काय योग्य आहे यानुसार नैतिकता ठरते असे 'नवजीत सिंघ जोहर आणि इ. वि. युनिअन ऑफ इंडिया' या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. मध्यंतरी अशा उत्पादनसंदर्भातील संशोधनासाठीचा कॅनडामधील एक पेटंट अर्ज भारतीय पेटंट कार्यालयाने नैतिकतेविरोधी आणि सार्वजनिक सुव्यवस्थेविरीधी असल्याच्या कारणावरून नाकारला होता.

crime news
Viral Video: मुंबईचा पठ्ठ्या लोकांच्या घरात सोडतोय रॉकेट; पाहा हा व्हिडिओ

३. विक्री आणि विकत घेणे हा देखील गुन्हा ठरू शकतो का?

भारतीय दंड संहितेच्या कलम २९२ नुसार अश्लील वस्तूंची खरेदी-विक्री, जाहिरात, आयात-निर्यात बेकायदेशीर आहे. कलम २९४ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता, अश्लील वर्तवणूक आणि लिखाण बेकायदेशीर आहे. त्यामुळे सेक्स टॉईजचा वापर खाजगीत होत असल्यास त्याला अश्लील समजणे चुकीचे ठरेल. सेक्स टॉईजचा वापर किंवा व्यापार अश्लीलता ठरतो का याबद्दल कायद्यामधे स्पष्ट तरतूद नाही. सन २०१८ पूर्वी भा. दं. सं. कलम ३७७ नुसार सेक्स टॉईजच्या वापरास ‘अनैसर्गिक शारीरिक संबंध’ समजून त्यावर बंदी होती. सन २०१८ मधे कलम ३७७ कायद्यामधून काढून टाकले गेले आणि त्यानुसार समलैंगिकता तसेच व्यक्तीच्या व्यक्तिसापेक्ष लैंगिक निवडीस कायद्याने मान्यता मिळाली तसेच या उत्पादनांच्या वापरावरील निर्बंध उठले. मात्र भा. दं. सं. कलम ३७६ नुसार संमतीशिवाय साथीदाराबरोबर सेक्स टॉईजचा वापर केला तर तो अपराध ठरू शकतो हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

कस्टम्स कायद्यानुसार या उत्पादनांची आयात-निर्यात बेकायदेशीर आहे. अशी बेकायदेशीर आयात केल्यास त्या वस्तू जप्त होऊ शकतात. सेक्स टॉईजचे उत्पादन आणि खरेदी- विक्री याला अश्लील वर्तन संबोधणारी स्पष्ट तरतूद भारतीय कायद्यात नाही. सन २०११ मधे 'कविता फुंबरा वि. कस्टम आयुक्त, कलकत्ता या प्रकरणात कलकत्ता उच्च न्यायालयाने “अशा उत्पादनांना ‘अश्लील’ संबोधले जाऊ शकत नाही” असे मत नोंदविले.

४. सेक्स टॉयवर बंदी असेल तर ई कॉमर्स वेबसाईट्सवर उपलब्ध कसे काय? तिथे काय नावाने विक्री केली जाते?

स्पष्ट तरतुदींच्या अभावे या वस्तूंच्या विक्रीवर कायद्याने निर्बंध नाहीत. म्हणूनच विविध प्रकारचे सेक्स टॉईज सध्या ऑनलाईन तसेच स्थानिक दुकानांमधे, काही ठिकाणी अगदी रस्त्यांवर विक्रीला असतात. ही विक्री करण्याची पद्धत जर अश्लील सिद्ध झाली तर सदर विक्री बेकायदेशीर ठरेल. विविध ई-कॉमर्स वेबसाईट्सवर मसाजर, इंटीमेट मसाजर यासारख्या नावांनी सेक्स टॉईज विकली जातात.

५. Sex toy आणि Right to privacy याचा संबंध आहे का?

भारतीय संविधानाने प्रत्येकास जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. याआधारे प्रत्येकाला स्वतःच्या शरीराच्या, लैंगिक अथवा शारीरिक संबंधांच्या गोपनीयतेचा (प्रायव्हसी) हक्क आहे. के. एस. पुत्तुस्वामी आणि इ. वि. युनिअन ऑफ इंडिया' या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने हे हक्क अधोरेखित केले आहेत.

६. सेक्स टॉयवरील बंदी मागे घ्यावी का?

'कामसूत्र' ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे परंतु आज भारतातच प्रौढांच्या लैंगिक आरोग्यास पूरक उत्पादनांविषयी पुरेशी जागरूकता नाही. लैंगिकतेविषयी अजूनही समाजात अभ्यासू वृत्तीने सहज संवाद करण्याचे प्रमाण कमी आहे. लैंगिकतेविषयी आपल्या जोडीदाराशीसुद्धा आपल्या आवडीबाबत मोकळेपणाने बोलणे अनेकांना अवघड होते तर त्याविषयी डोळसपणे अभ्यासपूर्वक प्रयोगशील राहणे ही तर खूप पुढील बाब. सेक्स टॉईजबद्दल समाजात टॅबू, अज्ञान आणि उत्सुकता आहे. अशा वस्तूंच्या दुकानांवर पोलिसांकडून जप्ती आल्याच्या बातम्या अधून-मधून समोर येतात. स्पष्ट कायदा नसल्याने ते वापरावे की नाही किंवा त्याचा व्यवसाय कारण्याप्रती लोकांमधे संदिग्धता आहे. लॉकडाऊनच्या काळात एकमेकांपासून दूर रहावे लागलेल्यांना किंवा कोणाच्या संपर्कात न जाता स्वतःच्या लैंगिक गरजा भागवण्यासाठी अनेकांना या उत्पादनांचा उपयोग झाला. भारतात आता काही स्टार्टअप्स अशी उत्पादने बनवू लागली आहेत आणि येत्या काळात या उत्पादनांना भरपूर मागणी येईल असा अंदाज आहे. भविष्यातील उत्पादनांचे अर्थकारण लक्षात घेता, तसेच भारतीय समाजाची एकंदर नैतिकता आणि समज यांचा सर्वकष विचार करून त्याविषयी सरकारने नियम-कायदे बनविणे गरजेचे आहे.

crime news
Viral Video : बिडीने लावली आग! काकाचे रॉकेट लाँचिंग बघून नासालाही आली जाग

७. सेक्स टॉयमुळे लैंगिक आजार होतात का?

आरोग्याच्या दृष्टिकोनातून या उत्पादनांचे फायदे तसेच तोटेही आहेत. योग्य काळजी न घेतल्यास सेक्स टॉयमुळे जंतुसंसर्ग तसेच लैंगिक संबंधातून उद्भवणारे इतर आजारही होऊ शकतात. यामुळे एकापेक्षाअधिक लोक एकच टॉय वापरत असतील तर त्याची पूर्ण स्वछता आणि निर्जंतुकीकरण याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. या उत्पादनांचा वापर करताना त्यासाठी वापरलेले साहित्य, बनावट, स्वछता, सुरक्षितता, वापराचे व्यसन लागण्याची शक्यता, आदी बाबींचा विचार करते गरजेचे आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला पण वाटते की सेक्स टॉईज लैंगिक आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. ही उपयुक्तता लक्षात घेता याबद्दल समाजात प्रबोधन होणे, योग्य वापराची माहिती देणे आवश्यक आहे. मात्र या उत्पादनांविषयी विशेष कायदा नसल्याने समाजात विशेषतः पौगंडावस्थेतील मुलं-मुलींसाठी लैंगिक शिक्षणातून याबद्दल प्रबोधन करणे शक्य नाही.

आज अशी उत्पादने सहज उपलब्ध होतात, १८ वर्षाखालील मुलांना अशी उत्पादने विकली जावी का याविषयी गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. अज्ञानी वयात योग्य मार्गदर्शनाशिवाय ही उत्पादने वापरणे हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यास घातक ठरू शकते. याचा दूरगामी परिणाम पुढे व्यक्तीच्या लैंगिक जीवनावरही होऊ शकतो. म्हणूनच आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही सेक्स टॉईजसंदर्भात कायदेविषयक तरतुदी करण्यासाठी सरकारने गंभीर पाऊल उचलणे गरजेचे आहे.

- अॅड. नंदिनी शहासने

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com