
प्रक्षेपक असलेल्या पीएसएलव्ही सी-५१ ची उंची ४४.४ मीटर होती. तसेच, ‘पीएसएलव्ही’ची ही ५३ वी मोहिम होती. ‘इस्रो’ने आतापर्यंत विविध देशांचे ३४२ उपग्रह अवकाशात सोडले आहेत.
श्रीहरीकोटा - भारताच्या पीएसएलव्ही सी-५१ या प्रक्षेपकाने आज ब्राझीलच्या ॲमेझोनिया-१ आणि इतर १८ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतरांनी भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) सर्व शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.
आज सकाळी १० वाजून २४ मिनिटे या नियोजित वेळी पीएसएलव्ही सी-५१ या प्रक्षेपकाने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून उड्डाण केले. उड्डाणानंतर १७ मिनीटांनी ॲमेझोनिया-१ उपग्रह अवकाशात त्याच्या नियोजित कक्षेत सोडण्यात आला. यानंतर सुमारे दीड तासांनंतर पुढील १० मिनिटांच्या कालावधीत एका मागून एक उर्वरित १८ उपग्रह अवकाशात अत्यंत अचूकपणे सोडण्यात आले. सर्व उपग्रह त्यांच्या नियोजित कक्षेत सोडण्यात आल्याचे ‘इस्रो’चे अध्यक्ष के. सिवन यांनी जाहीर केले.
प्रक्षेपक असलेल्या पीएसएलव्ही सी-५१ ची उंची ४४.४ मीटर होती. तसेच, ‘पीएसएलव्ही’ची ही ५३ वी मोहिम होती. ‘इस्रो’ने आतापर्यंत विविध देशांचे ३४२ उपग्रह अवकाशात सोडले आहेत.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
‘रायसोनी’चे यश
नागपूर : शहरातील जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘नॅनो सॅटेलाईट''ने आज ‘पीएसएलव्ही सी-५१’च्या साह्याने अवकाशात उड्डाण केले. रायसोनी अभियांत्रिकीच्या विविध शाखेतील १५ विद्यार्थी आणि चार प्राध्यापकांनी एकत्र येत दोन वर्षांच्या मेहनतीनंतर ‘नॅनो सॅटेलाईट'' तयार केला. त्यासाठी स्पेस प्रोग्रॅम डेव्हलपमेंट सर्बिया आणि बंगरुळ येथील टीएसटी टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडची मदत घेतली. तसेच टेस्टींगसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या प्रयोगशाळेची मदत झाली. या ‘नॅनो सॅटेलाईट''मुळे सोडण्यात येणाऱ्या सर्व उपग्रहांची स्थिती जाणून घेता येणे शक्य होणार आहे.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
असे करेल काम
जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नॅनो सॅटेलाईटचे वजन ३३० ग्रॅम असून लांबी व रुंदी १० सेंटीमीटर आहे. याशिवाय उंची ३.३ सेंटीमीटर आहे. हा ‘नॅनो सॅटेलाईट’ जमिनीपासून ४०० किलोमीटर अंतरावर पृथ्वीभोवती फिरेल. याद्वारे तो अवकाशातील उपग्रहांच्या स्थानाबद्दल माहिती गोळा करुन तीन ग्राउंड स्टेशनला देईल.
पहिली मोहिम
‘एनएसआयएल’ची पहिलीच व्यावसायिक मोहिम
‘इस्रो’ची २०२१ मधील पहिलीच मोहिम
ब्राझीलच्या उपग्रहाचे भारतातून प्रथमच प्रक्षेपण
उपग्रहावर मोदींची प्रतिमा
अवकाशात सोडलेल्या उपग्रहांमध्ये स्पेस किड्स इंडिया या संस्थेच्या एका उपग्रहाचाही समावेश होता. या उपग्रहामध्ये सुरक्षित डिजीटल कार्डच्या स्वरुपात भगवद्गीताही अवकाशात पाठविण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या आत्मनिर्भर भारत योजनेबद्दल आणि अवकाश संशोधन क्षेत्राचे खासगीकरण करण्याच्या निर्णयाबद्दल कृतज्ञता आणि आनंद व्यक्त करण्यासाठी या उपग्रहाच्या कवचावर मोदींची प्रतिमाही कोरण्यात आली आहे.