'इस्रो' शब्द पाळणार ; 'गगनयान' 2022 पर्यंत झेपावणार 

वृत्तसंस्था
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला दिलेल्या वचनाला अनुसरून आम्ही 2022 पर्यंत मानवाचा थेट सहभाग असलेले "गगनयान' हे अंतराळयान अवकाशात प्रक्षेपित करू, अशी घोषणा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज केली. या पहिल्या मानवी मोहिमेसाठी तीन भारतीय अंतराळवीरांची निवड केली जाणार असून, ते पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाच ते सात दिवस वास्तव्य करतील. या अंतराळवीरांसाठी लागणारे स्पेससूट देखील तयार असून, त्यांना प्रशिक्षणासाठी बंगळूर येथील संस्थेमध्ये पाठविण्यात येईल, असे "इस्रो'चे अध्यक्ष के. सिवान यांनी आज सांगितले. 

"पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात "गगनयान' मोहिमेसाठी 2022 ची डेडलाइन ठरवून दिली असून, आम्ही ती निश्‍चितपणे पाळू,'' असे सिवान यांनी नमूद केले. भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेचे सिवान यांनी आज दिल्लीतील पत्रकार परिषदेत सविस्तर सादरीकरण केले. अंतराळवीरांना घेऊन जाणारे "क्रू मॉड्यूल' हे "सर्व्हिस मॉड्यूल'ला जोडलेले असेल. या दोन्हींच्या एकत्र येण्याने "ऑर्बिटल मॉड्यूल' तयार होईल.

श्रीहरिकोट्टा येथून अंतराळवीरांना घेऊन उड्डाण करणारे "जीएसएलव्ही एम के-3' रॉकेट हे अंतराळवीरांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत नेऊन सोडेल. या कक्षेचे पृथ्वीपासूनचे अंतर साधारणपणे तीनशे ते चारशे किलोमीटर आहे. ही सगळी प्रक्रिया अवघ्या सोळा मिनिटांमध्ये पूर्ण होईल. हे अंतराळवीर पृथ्वीच्या कक्षेत काही वैज्ञानिक प्रयोगही करतील. परतीच्या प्रवासाच्या वेळी हेच ऑर्बिटल मॉड्यूल आपली दिशा बदलत पृथ्वीच्या दिशेने येईल. 

आकाशामध्ये 120 किलोमीटर उंचीवर असतानाच "क्रू मॉड्यूल' हे "सर्व्हिस मॉड्यूल'पासून वेगळे होईल. या वेळी पृथ्वीच्या दिशेने परतत असताना वेग कमी करण्यासाठी "क्रू मॉड्यूल' एअरोब्रेकचा वापर करेल. पुढे पॅराशूटच्या माध्यमातून ते गुजरात किनारपट्टीवरील अरबी समुद्रात उतरेल. ही सगळी प्रक्रिया केवळ 36 मिनिटांमध्ये होईल, असेही "इस्रो'च्या प्रमुखांनी नमूद केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ISRO will keep the word Gaganayan will run till 2022