Chandrayaan 2 : कधी फडकणार चंद्रावर तिरंगा? 'विक्रम' लँडर झालेय सज्ज!

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

भारतीय अवकाश संशोधन संस्थेसाठी (इस्रो) ही ऐतिहासिक कामगिरी असणार आहे. भारताचा तिरंगा प्रथमच चंद्रावर फडकणार आहे. ही कामगिरी फत्ते होईल, याबाबत शास्त्रज्ञांनाही विश्‍वास आहे.

बंगळूर : भारताच्या दुसऱ्या चांद्र मोहिमेची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. 'चांद्रयान- 2'पासून वेगळा झालेला 'विक्रम' लँडर चांद्रभूमीवर सुखरूप उतरण्याची इच्छा प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. शनिवारी (ता.7) पहाटे दीड ते अडीच या वेळेत 'विक्रम' लँडर ही कामगिरी करणार आहे. ही कामगिरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमेत देशभरातून निवडलेले 60 विद्यार्थीही 'इस्रो'च्या मुख्यालयातून पाहणार आहेत. 

भारतीय अवकाश संशोधन संस्थेसाठी (इस्रो) ही ऐतिहासिक कामगिरी असणार आहे. भारताचा तिरंगा प्रथमच चंद्रावर फडकणार आहे. ही कामगिरी फत्ते होईल, याबाबत शास्त्रज्ञांनाही विश्‍वास आहे. ''विक्रम लँडर चंद्रावर उतरणे (सॉफ्ट लँडिंग) ही अत्यंत महत्त्वाची कामगिरी असणार आहे, त्यात 100 टक्के यश येईल,'' असे मत 'इस्रो'चे माजी अध्यक्ष जी. माधवन नायर यांनी व्यक्त केले आहे. 'चांद्रयान- 1'ची मोहीम जी. माधवन नायर यांच्याच नेतृत्वाखाली पूर्णत्वास गेली होती. 

''चंद्रावर 'सॉफ्ट लँडिंग' करणे ही अत्यंत किचकट प्रक्रिया आहे. आतापर्यंत सर्व गोष्टी ठरल्यानुसार झाल्या आहेत, उर्वरित गोष्टीही व्यवस्थित पार पडतील,'' अशी आशा 'इस्रो'चे आणखी एक माजी अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांनी व्यक्त केली. 
'चांद्रयान- 1'चे प्रकल्प संचालक आणि 'मंगळयान' मोहिमेचे कार्यक्रम संचालक ए. अण्णादुरई यांनीही मोहीम यशस्वी होण्याचा विश्‍वास व्यक्त केला. उड्डाणापूर्वी चांद्रयान- 2 आणि विक्रम लँडरच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या आहेत, त्यामुळे प्रत्यक्षात काही अडचण निर्माण होणार नाही, असेही ते म्हणाले. 

'इस्रो'ने 22 जुलै रोजी 'चांद्रयान- 2'चे प्रक्षेपण केले होते. सुमारे 978 कोटी रुपये खर्च आलेल्या या मोहिमेतील महत्त्वाचा एक टप्पा 2 सप्टेंबर रोजी पार पडला. त्या वेळी चांद्रयानापासून विक्रम लँडर वेगळा करण्यात आला. त्यानंतर पुढील दोन दिवसांत कक्षाबदल करून 'विक्रम'ला चंद्राच्या आणखी जवळ नेण्यात आले. प्रग्यान ही बग्गीही 'विक्रम'मध्ये आहे. शनिवारी पहाटे दीड ते अडीच वाजण्याच्या दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या जवळ 'विक्रम' चंद्रावर उतरणार आहे. 

- संजय राऊतांकडून रोहित पवारांची प्रशंसा; म्हणाले...

विद्यार्थीही अनुभवणार थरार 
'चांद्रयान- 2' मोहिमेनिमित्त 'इस्रो'ने घेतलेल्या प्रश्‍नमंजूषा स्पर्धेत 60 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 'चांद्रयान- 2'ची कामगिरी 'इस्रो'च्या मुख्यालयात बसून पाहता येणार आहे. प्रश्नमंजूषा स्पर्धेत वीस प्रश्‍न विचारण्यात आले होते व त्यांची उत्तरे 10 मिनिटांत द्यायची होती. यात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ISROs Vikram lander all set to land on Moon