J P Nadda : थापांमुळे गुजरातची माफी मागा; जे. पी. नड्डा यांचे अरविंद केजरीवाल यांना आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

J P Nadda arvind kejriwal should Apologize to Gujarat  politics

J P Nadda : थापांमुळे गुजरातची माफी मागा; जे. पी. नड्डा यांचे अरविंद केजरीवाल यांना आवाहन

नवी दिल्ली : गुप्तचर विभागाचा कथित अहवाल दाखवून आम आदमी पक्षाच्या विजयाचा दावा करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी थापा मारल्याबद्दल गुजरातच्या जनतेची माफी मागावी, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले. केजरीवाल यांनी ऑक्टोबरमध्ये गुजरातच्या निवडणूकीसाठी प्रचार करताना एक अहवाल दाखविला होता. गुजरातमध्ये आप सरकार स्थापन करेल असे या अहवालात नमूद करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. यासंदर्भात नड्डा एका कार्यक्रमात पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, गुजरात आणि हिमाचल प्रदेश येथील विधानसभा निवडणुकांत आपच्या अनेक उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली, पण त्याबद्दल कुणीही भाष्य करीत नाही. केजरीवाल वाराणसीला गेले, तेथे ते पराभूत झाले. मग परत येऊन त्यांनी माफी मागितली. उत्तर प्रदेशातही त्यांना अपयश आले.

आपच्या उमेदवारांनी गोव्यात ३९ पैकी ३५, तर हिमाचलमध्ये ६८ पैकी ६७ ठिकाणी अनामत रक्कम गमावल्याचे नड्डा यांनी नमूद केले . हिमाचलच्या जवळ असलेल्या पंजाबमध्ये आपची सत्ता असताना मूलतत्त्ववाद, बेबंदशाही आणि गटांमधील संघर्षात वाढ झाल्याचेही नड्डा यांनी सांगितले.

सार्वजनिक जीवनात एखादी व्यक्ती अशी कशी वागू शकते हे पाहून धक्का बसतो. याबद्दल कुणीही बोलत नाही. आम्ही अशा घोडचुका केल्या तर आमची राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल. राजकीय नेता त्याच्या विश्वासार्हतेबद्दल ओळखला जात असतो आणि त्या नेत्याच्या विश्वासार्हतेनुसार त्याच्या पक्षाची ओळख निर्माण होत असते.

- जे. पी. नड्डा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष