Jagdeep Dhankhar : राज्यसभाध्यक्ष म्हणून धनखड यांनी पहिल्या दिवशीच घेतली कडक भूमिका

नवे राज्यसभाध्यक्ष म्हणून जगदीप धनखड यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यसभा आपला समृध्द वारसा केवळ पुढे नेणार नाही तर नवीन उंचीवर नेईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला.
Jagdeep Dhankhar
Jagdeep DhankharSakal
Summary

नवे राज्यसभाध्यक्ष म्हणून जगदीप धनखड यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यसभा आपला समृध्द वारसा केवळ पुढे नेणार नाही तर नवीन उंचीवर नेईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला.

नवी दिल्ली - नवे राज्यसभाध्यक्ष म्हणून जगदीप धनखड यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यसभा आपला समृध्द वारसा केवळ पुढे नेणार नाही तर नवीन उंचीवर नेईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. आपण साऱया पक्षांच्या नेत्यांना बोलण्यासाठी पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न करू, मात्र निर्धारित वेळ पाळणे ही तुमचीही जबाबदारी आहे, असे धनखड यांनी पहिल्याच दिवशी बजावले.

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. राज्यसभाध्यक्ष म्हणून धनखड यांनी आजच सूत्रे स्वीकारली. मात्र वेळ न पाळणाऱयांसाठी पहिल्या दिवशीच त्यांनी कडक भूमिका घेतल्याचे पहिल्याच दिवशी दिसले. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह सर्वच पक्षनेत्यांनी, ‘राज्यसभेत विरोधी सदस्यांना पुरेसा वेळ द्यावा आणि मह्वाची विधेयके संसदीय समित्यांकडे न पाठवता परस्पर मंजूर करण्याचे प्रकार थांबवावेत,‘ अशी आग्रही विनंती धनखड यांना केली.

‘मेरे बारे में कोई राय मत बनाना गालिब । मेरा वक्त भी बदलेगा मेरी राय भी बदलेगी ,‘ असे खर्गे यांनी सांगताच सभागृहात हास्याचे फवारे उडाले. पहिल्या दिवशी या सभागृहात तुम्हाला सर्व शिस्तबध्द सदस्य दिसत आहेत. मात्र आगामी काळात तुम्हाला ‘लोकशाहीचे वैशिष्ट्य' या सभागृहातही दिसेल, असे सांगून माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल म्हणाले की राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सूचना पालन करताना राष्ट्रवादीच्या खासदारांनी संसदेत कधीही वेलमध्ये गोंधळ घालून ‘लक्ष्मणरेषा‘ ओलांडली नाही.

धनखड यांचा हजरजबाबीपणा राज्यसभेच्या कामकाजातही दिसेल असे सांगून मोदी म्हणाले की शेतकरी पुत्र व "डाऊन टू अर्थ" असलेले अध्यक्ष मिळणे हे सभागृहाचे भाग्य आहे. तुम्ही अशा वेळी राज्यसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेत आहात जेव्हा भारताला जी-२० परिषदेच्या यजमानपदाची जबाबदारी देण्यात आली आहे आणि स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरच्या प्रवासाला देशाने सुरवात केली आहे. हा कालावधी केवळ विकसित भारताच्या नाही, तर या काळात जगाची भविष्यातील दिशा ठरवण्यातही भारताची भूमिका महत्त्वाची असेल. या निर्णायक काळात वरिष्ठ सभागृहाला तुमच्यासारखे सक्षम आणि प्रभावी नेतृत्व मिळाले याचा आनंद वाटत आहे. तुमच्या मार्गदर्शनाखाली सर्व सभासद आपापली कर्तव्ये प्रभावीपणे पार पाडतील. हे सभागृह देशाचे संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ बनेल.

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची दलित पार्श्वभूमी आणि विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आदिवासी पार्श्वभूमीचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की शेतकरी पुत्र असलेले धनखड देशाच्या गावाचे, गरीब आणि शेतकर्‍यांच्या ऊर्जेचे प्रतिनिधित्व करत आहेत. "यश साधनांमुळे नाही तर साधना करून मिळते याचा पुरावा धनखड यांचे जीवन आहे.

वकील म्हणून धनखर यांच्या कर्तृत्वाचा उल्लेख करून पंतप्रधानांनी सांगितले की या सभागृहात असे अनेक सदस्य तुम्हाला भेटतील जे तुम्हाला न्यायालयातही भेटत होते. त्यामुळे तुम्हाला येथे चुकल्याचुकल्यासारखे वाटणार नाही !राज्यसभेचे माजी अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांच्या कार्यकाळाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या शब्दांची आणि यमकांची निवड नेहमी सभागृहाला प्रसन्न ठेवत असे. तुमचा हजरजवाबी, विनोदी स्वभाव ही कमतरता कधीच जाणवू देणार नाही अशी खात्री मला आहे.

कोण काय म्हणाले -

रामगोपाल यादव - लोकभावनेच्या विरोधात सरकारच्या निर्णयांच्या विरोधात संसदेत आवाज उठवणे हे विरोधकांचे कर्तव्य आहे. त्यामुळे गोंधळ होणारच नाही असे आश्वासन मी तुम्हाला देऊ शकत नाही.

प्रियांका चतुर्वेदी - तुमच्याकडून हीच अपेक्षा राहील की तुम्ही विरोधकांचे म्हणणे एकून घ्यावे. जेव्हा अहंकार जनतेचा आवाज एकेनासा होतो तेव्हा संसदेत लोकभावना मांडणे विरोधकांचे कर्तव्य आहे.

रजनी पाटील - आपल्या पत्नीला ‘चूल व मूल' एवढ्यापुरतेच मर्यादित न ठेवता तिला प्रगतीसाठी सतत प्रोत्साहन देणारे तुमच्यासारखे अध्यक्ष राज्यसभेला लाभले आहेत.

जयंत चौधरी - राज्यसभेत वेळोवेळी काही कटू विषय उपस्थित करण्याचीही परवानगी आपण द्यावी.

वायको - धर्मरिपेक्षता, सामाजिक न्याय हे शब्द इतिहासजमा झालेले आहेत. बहुमताचा वापर विरोधकांचा आवाज चिरडून टाकण्यासाठी वापरला जाऊ नये.

जोस के मणी - केवळ निवडणुकांसाठी संसद अधिवेशनाच्या वेळा बदलण्याचे प्रकार तुम्ही रोखाल अशी आशा आहे.

रामदास आठवले (मंत्री) - लोकसभेत तुमचा एकही खासदार नाही तरी तुम्ही मंत्री कसे ? असे विचारणाऱयांना मी सांगतो की हा प्रश्न तुम्ही नरेंद्र मोदीयांना विचारा. तुम्ही मला बोलू दिले तरच मी कविता करेन. नाही तर एकही कविता म्हणणार नाही !

पी. टी. उषा - शेतकरी कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला उपराष्ट्रपतीपद देणे हा ग्रामीण भागाचा सन्मान आहे.

प्रेमचंद गुप्ता - ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली असणारी व्यक्ती संसदेच्या वरिष्ठ सभागृहात अध्यक्षपदापर्यंत पोहोचते हा लोकशाहीचा चमत्कार आहे.

एल्लमारम करीम - सदनात लोकशाही मार्गाने चर्चा होऊन सर्वपक्षीय खासदारंना संधी मिळावी व संसदीय समित्यांना टाळून परस्पर विधेयके मंजूर करण्याचे प्रकार थांबावेत.

थंबी दुराई - तमिळनाडूच्या प्रश्नांवरील चर्चेसाठी पुरेसा वेळ मिळावा.

के. केशव राव - राज्यसभेतील विरोधकांचाही आवाज एकला जायला पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com