esakal | जालियनवाला सुशोभिकरणावरून रण पेटले
sakal

बोलून बातमी शोधा

desh

जालियनवाला सुशोभिकरणावरून रण पेटले

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अमृतसरमधील जालियनवाला बागेचे नूतनीकरण केल्याचा मुद्दा पेटला आहे. यात या ऐतिहासिक ठिकाणाचे महत्त्व नष्ट केल्यावरून पंजाबात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. हे सुशोभीकरण म्हणजे स्वातंत्र्यलढ्याचा इतिहासच बदलण्याचा प्रयत्न असून तो त्वरित थांबवला नाही तर दिल्लीत धडक देण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दिल्लीच्या सीमांवर गेले १० महिने सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे आव्हान कायम असतानाच जालियनवाला बागेच्या सुशोभीकरणावरून पंजाबात वादाची ठिणगी पडल्याने नरेंद्र मोदी सरकारसमोरील डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. १३ एप्रिल १९१९ रोजी जालियनवाला बाग येथे जनरल डायर याच्या आदेशाने बेछूट गोळीबार होऊन हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. या स्मारकाचे नूतनीकरण नुकतेच केंद्राने केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ ऑगस्टला या नवीन स्मारकाचे उदघाटन केले होते. मात्र ते करताना सरकारने या जागेचे महत्त्व कमी केल्याचा व नूतनीकरणाच्या नावाखाली विद्रुपीकरण केल्याचा आरोप होत आहे. त्यावरूनच आंदोलन पेटले आहे. याचे नेतृत्व आता विद्यार्थ्यांकडे आहे. हे राष्ट्रीय स्मारक स्वातंत्र्यचळवळीचे व पंजाबच्या अस्मितेचे प्रतीक आहे. नूतनीकरण करताना या जागेचे ऐतिहासिक महत्त्व नष्ट केले असा आरोप आहे.

पंजाब विद्यार्थी संघटना व नौजवान भारत सभा या संघटनांनी हे नूतनीकरण रद्द करावे अशी मागणी केली आहे. या दोन्ही संघटनांच्या विद्यार्थ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. या संघटनेच्या नेत्या हरदीप कौर म्हणाल्या, की ऐतिहासिक स्मारकाचे नूतनीकरण करताना त्याचे महत्त्व व इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जात नाही व येथे या दोन्ही चुका घडल्या आहेत. या जागेला मुळात एकच दरवाजा होता. आता दोन दरवाजे केले आहेत. ते पाहून कोणाच्याही मनात प्रश्न येईल की दोन दरवाजे असताना लोकांनी विहिरीत उड्या का मारल्या. जनरल डायर याच्या क्रूरतेचे साक्षीदार असलेल्या जालियनवाला बागेत शिरतानाच भाजपचे कमळ हे चिन्ह लावण्याचे प्रयोजन काय, दुसऱ्या फुलाची चित्रेही लावता येतील. त्या हत्याकांडात मृत्यूमुखी पडलेल्या हुतात्म्यांपैकी मुस्लिम समाजातील नावे काढून टाकली आहेत. हे का केले ?

इतिहासाची कथा बदलण्याचे कारस्थान

सुशोभीकरण हा कोणत्या अजेंड्याचा भाग आहे का, असा सवाल केला जात आहे. विद्यार्थी संघटनेचे नेते रणबीरसिंग रंधावा म्हणाले, की जालियनवाला बागेचा पूर्ण लुक बदलून टाकण्यात आला आहे. जेव्हा तुम्ही प्रवेश करता तेव्हा नृत्य करणाऱ्या लोकांचे पुतळे बसविण्यात आले आहेत. ती ऐतिहासिक विहीरही झाकून टाकली आहे. हे पाहून कोणाच्याही मनात गंभीरतेचा भाव येणार नाही.

जालियनवाला बागेचा संघर्ष हा साम्राज्यवादी शक्तींच्या विरोधात होता. पण भाजपने या संघर्षाला त्यांच्या व्याख्येतील राष्ट्रवादाचा रंग दिला असून हा प्रकार अत्यंत निंदनीय व निषेधार्ह आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील पंजाबच्या इतिहासाची कथा बदलण्याचे कारस्थान पंजाबचे युवक कदापी यशस्वी होऊ देणार नाहीत. आमचे आंदोलन बेमुदत असून हे नूतनीकरण रद्द केल्याशिवाय थांबणार नाही असाही इशारा त्यांनी दिला.

loading image
go to top