जम्मू-काश्‍मीरात इंटरनेट सेवा अंशतः सुरु

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

- शुक्रवारच्या प्रार्थनेच्या पार्श्‍वभूमीवर आज अनेक भागांतील फोन आणि इंटरनेट सेवा सुरळीत.

श्रीनगर : पाच दिवसांच्या संचारबंदीनंतर जम्मू आणि काश्‍मीरने आज काहीसा मोकळा श्‍वास घेतला. शुक्रवारच्या प्रार्थनेच्या पार्श्‍वभूमीवर आज अनेक भागांतील फोन आणि इंटरनेट सेवा सुरळीत झाली. संवेदनशील भागांतील सुरक्षा दलांचा बंदोबस्त वाढविण्यात आला असून, श्रीनगरमधील प्रसिद्ध जामा मशिदीची दारे सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आली आहेत. 

सामूहिक प्रार्थना सुरळीत पार पडली तर निर्बंध आणखी शिथिल केले जाऊ शकतात. सध्या लोकांना शेजारील मशिदीत प्रार्थना करण्याची मुभा देण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्या सूचनेनंतरच हे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. केवळ निर्बंधांमुळे कोणत्याही काश्‍मिरीला त्रास होता कामा नये, अशा स्पष्ट सूचनाच दोवाल यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, संभाव्य आंदोलन लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, उमर अब्दुल्ला यांच्यासह चारशे नेत्यांना कोठडीत ठेवण्यात आले असून, आणखी काही काळ त्यांना हा बंदिवास सोसावा लागू शकतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jammu and Kashmir Internet service started partly