जम्मू-काश्मीर आमचा अंतर्गत प्रश्न; भारताने पाकला सुनावले खडे बोल

वृत्तसंस्था
Thursday, 8 August 2019

पाकिस्तानने भारताशी व्यापारी संबंध तोडल्यानंतर भारताने राजनैतिक संबंध जपण्यासाठी या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करावा, असे सांगितले आहे.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटविल्याप्रकरणी पाकिस्तानने भारताला लक्ष्य बनविण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे भारतानेदेखील पाकिस्तानला खडे बोल सुनावत काश्मीर प्रश्न हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगितले आहे. कलम 370 बाबतच्या ज्या काही घडामोडी घडत आहेत, तो आमचा अंतर्गत विषय आहे. त्यामुळे तुम्ही ढवळाढवळ करू नका, अशी भूमिका भारताने घेतली आहे. 

तसेच काश्मीर प्रश्नावरून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र निर्माण करून पाकिस्तानने इतर देशांना हस्तक्षेप करायला भाग पाडू नये. त्यात ते कधीच यशस्वी होणार नाहीत. भारत सरकार जम्मू-काश्मीरचा विकास करण्यासाठी पावले उचलत असून संविधानात नमूद करण्यात आलेल्या काही तरतुदींमुळे यामध्ये अडथळा येत होता, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

पाकिस्तानने भारताशी व्यापारी संबंध तोडल्यानंतर भारताने राजनैतिक संबंध जपण्यासाठी या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करावा, असे सांगितले आहे. पाकिस्तानचा हा एकतर्फी निर्णय असून यामुळे दोन्ही देशांचे संबंध धोकादायक वळणावर पोहोचण्याची शक्यता निर्माण होईल, असे मत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jammu and Kashmir related issues are our internal matter