जम्मू-काश्मीरच्या स्थानिक निवडणुकीत उमेदवारावर गोळीबार; दहशतवादी पसार 

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 4 December 2020

म्मू काश्‍मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या तिसऱ्या टप्प्यातील ३३ जागांसाठी आज मतदान झाले.

श्रीनगर- जम्मू काश्‍मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या तिसऱ्या टप्प्यातील ३३ जागांसाठी आज मतदान झाले. मतदानादरम्यान अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी डीडीसीच्या एका उमेदवारावर गोळीबार केला. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

तिसऱ्या टप्प्यात काश्‍मीर खोऱ्यातील १६ जागा आणि जम्मू विभागात १७ जागांचा समावेश आहे. २८ नोव्हेंबरपासून सुरू झालेली निवडणुकीची प्रक्रिया १९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. एकूण आठ टप्प्यात मतदान होणार असून २२ रोजी मतमोजणी होणार आहे. आज तिसऱ्या टप्प्यांतील मतदान सुरू असताना अनंतनाग जिल्ह्यात कोकेनर्ग भागात उमेदवार अनिशुल इस्लाम गानेई यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. गोळीबारानंतर दहशतवादी पळून गेले. उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्ल्यानंतर पोलिसांनी परिसराची नाकाबंदी केली. 

VIDEO : जम्मू-काश्मीरच्या स्थानिक निवडणुकीत केलं पहिल्यांदाच मतदान; मतदारांचा...

दरम्यान, जम्मू काश्‍मीर पोलिसांनी जम्मू येथे गौरव शर्मा ऊर्फ गोल्डी नावाच्या व्यक्तीला अटक केली असून त्याच्यावर रोकड वाटण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याच्याकडून ५८ हजार रुपये जप्त केले आहेत. हे पैसे कोणी दिले, याचा शोध सुरू आहे. दुसरीकडे सकाळच्या सत्रात मतदानाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सकाळी नऊच्या सुमारास ८ टक्के मतदान झाले होते. तत्पूर्वी १ डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यात ४९ टक्के लोकांनी सहभाग घेतला होता. 

दरम्यान, पाकिस्तानातून भारतात आलेल्या निर्वासितांना ७० वर्षात प्रथमच जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता आला. त्यांनी तिसऱ्या टप्प्यात मतदान केले.. ढोल वाजवून लोकशाहीचा हक्क मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jammu kashimr election dcc candidate got shot by terrorist