
श्रीनगरमधील प्रकार; पोलिसांकडून तपास सुरू
जम्मू: अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या मोहंमद ईसा फझीलने आपले शिक्षण अर्ध्यावर सोडून दहशतवादाचा मार्ग निवडल्याची घटना जम्मू आणि काश्मीरमध्ये समोर आली आहे. "एके-47' या बंदुकीसोबत त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याचा तपास सुरू केला आहे.
श्रीनगरमधील सौरा भागात असलेल्या शादाब कॉलनीत राहणारा मोहंमद राजौरीतील बाबा गुलाम शाह बादशाह विद्यापीठात बी.टेक.चे (आयटी) शिक्षण घेत होता. अचानक 17 ऑगस्ट रोजी तो वसतिगृहातून बेपत्ता झाला होता. त्यानंतर दोन- तीन दिवसांनी हातात रायफल घेतलेली छायाचित्रे त्याने फेसबुकवर टाकून आपण जिहादमध्ये सामील झाल्याची माहिती दिली.
फेसबुकवरील माहितीनुसार, तो अल कायदाच्या उपसंघटनेत सहभागी झाल्याचे स्पष्ट झाले असून, पोलिसांनी याचा तपास सुरू केला आहे.
पोलिसांसमोर आव्हान
मोहंमद हा दोन महिन्यांच्या सुटीमुळे त्याच्या घरी गेला होता. या काळात तो दहशतवाद्यांच्या संपर्कात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तो बेपत्ता झाल्याची माहिती त्याच्या पालकांना कळविण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांची माथी भडकावून त्यांना दहशतवादाच्या जाळ्यात ओढण्याचे प्रकार सातत्याने समोर येत असून, ते रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.