जपानही करणार 'स्मार्ट सिटी' प्रकल्पासाठी सहकार्य

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जानेवारी 2017

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी "स्मार्ट सिटी' प्रकल्पात समाविष्ट असलेल्या चेन्नई, अहमदाबाद आणि वाराणसी या तीन शहरांना स्मार्ट सिटी बनविण्यासाठी जपानने सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी "स्मार्ट सिटी' प्रकल्पात समाविष्ट असलेल्या चेन्नई, अहमदाबाद आणि वाराणसी या तीन शहरांना स्मार्ट सिटी बनविण्यासाठी जपानने सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांच्यासोबत आज जपानचे भारतातील राजदूत केनजी हिरामत्सु यांची बैठक झाली. त्यामध्ये केनजी यांनी भारतातील शहरांच्या विकासासाठी भारत सरकारच्या प्रकल्पांमध्ये भागीदार होण्यास जपान उत्सुक असल्याचे सांगितले. हे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याबाबत नायडू यांनी यावेळी सांगितले. त्यावर केनजी यांनी, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा कृतींवर आधारित दृष्टिकोन जुळवून घेण्यास आम्हाला आवडेल', असे स्पष्ट केले. युकेचे उच्चायुक्त डॉमिनीक अस्क्विथ यांनीही नायडू यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नागरी विकासासंदर्भात ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आल्यानंतर भारत आणि ब्रिटनमध्ये झालेल्या सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीबाबत चर्चा केली.

स्मार्ट सिटी प्रकल्पातील एकूण शहरांपैकी 15 शहरांच्या विकास करण्यासाठी आतापर्यंत जगातील प्रमुख देश समोर आले आहेत. युकेने पुणे, अमरावती आणि इंदोर; फ्रान्सने चंदीगढ, पुद्दुचेरी आणि नागपूर; जर्मनीने भुवनेश्‍वर, कोईम्बतूर आणि कोची तर युनायटेड स्टेटस्‌ डेव्हलपमेंट एजन्सीने विशाखापट्टनम, अजमेर आणि अलाहाबाद ही शहरे विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Japan to assist india with development of three smart cities