esakal | जवानांसाठी नॉन बुलेटप्रूफ ट्रक आणि मोदींसाठी 8400 कोटींचे विमान, राहुल गांधींचा निशाणा
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi modi.jpg

या व्हिडिओत एका ट्रकमध्ये काही जवान आपापसांत बोलत आहेत. नॉन बुलेटप्रुफ गाडीत पाठवून आपल्या जीवाशी खेळले जात आहे, असे एक जवान म्हणत आहे.

जवानांसाठी नॉन बुलेटप्रूफ ट्रक आणि मोदींसाठी 8400 कोटींचे विमान, राहुल गांधींचा निशाणा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. या व्हिडिओत एका ट्रकमध्ये काही जवान आपापसांत बोलत आहेत. नॉन बुलेटप्रुफ गाडीत पाठवून आपल्या जीवाशी खेळले जात आहे, असे एक जवान म्हणत आहे. राहुल गांधी यांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, आपल्या जवानांना नॉन बुलेटप्रुफ ट्रकमध्ये शहीद होण्यासाठी पाठवले जात आहे आणि आमच्या पंतप्रधानांसाठी 8400 कोटी रुपयांचे आलिशान विमान! हा न्याय आहे का?

राहुल गांधी सातत्याने चीनबरोबरील सीमा वादाचा मुद्दा उपस्थित करत आहेत. पंतप्रधानांसाठी नवे विमान आल्यानंतर त्यांना आणखी एक नवा मुद्दा मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वीही राहुल गांधी यांनी टि्वट केले होते. पंतप्रधानांनी स्वतःसाठी 8400 कोटींचे विमान खरेदी केले. एवढ्या पैशांत सियाचिन-लडाख सीमेवर तैनात जवानांसाठी भरपूर गोष्टी खरेदी करता आल्या असत्या. 30,00,000 गरम कपडे, 60,00,000 जॅकेट, हातमोजे, 67,20,000 बूट, 16,80,000 ऑक्सिजन सिलिंडर. पंतप्रधानांना केवळ आपल्या इमेजची चिंता आहे, सैनिकांची नाही. 

राहुल गांधी यांनी शुक्रवारीही मोदींवर टीका केली होती. पंतप्रधान मोदी यांचा डेन्मार्कच्या पंतप्रधानांबरोबरील चर्चेदरम्यानचा एक व्हिडिओ त्यांनी शेअर करत आमच्या पंतप्रधानांना काही समजत नाही, असे म्हटले होते. 'खरा धोका हा नाही की, आमच्या पंतप्रधानांना काही समजत नाही. धोका हा आहे की त्यांच्याजवळ असणाऱ्यांपैकी एकाचीही हे सांगण्याची हिंमत नाही,' असा टोला त्यांनी आपल्या टि्वटमधून लगावला होता. 

हेही वाचा- राहुल गांधींनी शेअर केला मोदींची खिल्ली उडवणारा व्हिडिओ 

राहुल गांधी यांच्या या टि्वटनंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी राहुल यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केला. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी तर या विषयाशी निगडीत संशोधनाच्या बातम्याच टि्वट करत राहुल गांधी यांनी एकदा हे वाचावे, असा सल्ला दिला होता.