esakal | राहुल गांधींनी शेअर केला मोदींची खिल्ली उडवणारा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi pm modi.jpg

राहुल गांधी यांच्या या टि्वटनंतर तासाभरातच भाजप नेत्यांनी पलटवार करण्यास सुरुवात केली.

राहुल गांधींनी शेअर केला मोदींची खिल्ली उडवणारा व्हिडिओ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांचा डेन्मार्कच्या पंतप्रधानांबरोबरील चर्चेदरम्यानचा एक व्हिडिओ राहुल गांधी यांनी शेअर करत आमच्या पंतप्रधानांना काही समजत नाही, असे म्हटले आहे. 'खरा धोका हा नाही की, आमच्या पंतप्रधानांना काही समजत नाही. धोका हा आहे की त्यांच्याजवळ असणाऱ्यांपैकी एकाचीही हे सांगण्याची हिंमत नाही,' असा टोला त्यांनी आपल्या टि्वटमधून लगावला आहे. 

या व्हिडिओत मोदी हे पवन ऊर्जेबाबत बोलत आहेत. पवनचक्कीच्या माध्यमातून हवेतून पाणी काढता येते, असे पंतप्रधान मोदी यांनी डेन्मार्कच्या पंतप्रधानांना सांगितले. राहुल गांधी यांच्या या टि्वटनंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी राहुल यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केला. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी तर या विषयाशी निगडीत संशोधनाच्या बातम्याच टि्वट करत राहुल गांधी यांनी एकदा हे वाचावे, असा सल्ला दिला. 

पंतप्रधान मोदी यांनी पवन ऊर्जा आणि पाण्याबाबत सांगितल्यानंतर डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी स्मित हास्य करत मोदींनी डेन्मार्कला येऊन येथील अभियंत्यांना हे तंत्र समजवण्याचे निमंत्रण दिले. 

हेही वाचा- बिहार निवडणूक - माजी DGP गुप्तेश्वर पांडेंवर भारी पडला माजी पोलिस कॉन्स्टेबल

राहुल गांधी यांच्या या टि्वटनंतर तासाभरातच भाजप नेत्यांनी पलटवार करण्यास सुरुवात केली. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी म्हटले की, राहुल गांधीं यांना काहीच समजत नाही, असे सांगण्याची हिंमत असलेले त्यांच्याजवळ कोणीच नाही. ते पंतपधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांची खिल्ली उडवतात. उलट जगातील आघाडीच्या कंपन्यांचे सीईओ पंतप्रधान मोदींच्या विचाराशी सहमत आहेत.

हेही वाचा- चारा घोटाळा - लालूंना 'बेल' तरीही मुक्काम 'जेल'मध्येच

अमेठीमध्ये राहुल गांधी यांना पराभूत करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला. असे दिसते की, कॉंग्रेसचा खरा धोका वाढत आहे. कोणामध्ये युवराजांना काही सांगण्याची हिंमत नाही, अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधी यांचा समाचार घेतला.