कर्नाटकात भाजप सरकारला जेडीएसचा पाठिंबा?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 July 2019

आज झालेल्या जेडीएस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत काही आमदारांनी भाजपला पाठिंबा देण्याचा सल्ला दिला. याबाबत कुमारस्वामी व एच. डी. देवेगौडा यांना निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला. 

बंगळूर : कॉंग्रेसबरोबर चौदा महिने आघाडी करून सरकार स्थापन केलेल्या माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यावर भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देण्यासाठी पक्षाच्याच आमदारांचा दबाव येत आहे. आज झालेल्या जेडीएस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत काही आमदारांनी भाजपला पाठिंबा देण्याचा सल्ला दिला. याबाबत कुमारस्वामी व एच. डी. देवेगौडा यांना निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला. 

काही आमदारांनी भाजप सरकारला पाठिंबा देण्याचा, तर काही आमदारांनी बाहेरून पाठिंबा देण्याचा बैठकीत सल्ला दिला. काहींनी मात्र विरोधात बसून पक्ष मजबूत करण्याची सूचना केली. बैठकीनंतर माजी मंत्री जी. टी. देवेगौडा यांनी ही माहिती दिली. देवेगौडा व कुमारस्वामी या संदर्भात जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे जी. टी. देवेगौडा म्हणाले. सोमवारच्या विश्वासदर्शक ठरावापूर्वी कुमारस्वामी पक्षाचे धोरण स्पष्ट करतील, असे त्यांनी सांगितले. 

आतापर्यंत अलिप्त राहिलेले जेडीएसचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा बंडखोर आमदारांचे मन वळविण्याच्या कामाला लागले आहेत. आर. आर. नगर व के. आर. पुरम येथील जेडीएसच्या नेत्यांची देवेगौडा यांनी बैठक बोलाविली होती. त्यांच्याशी पोटनिवडणुकीबाबत चर्चा करून त्यांनी काही सूचनाही दिल्या.

उद्या यशवंतपूर व महालक्ष्मी लेआउटमधील नेत्यांची त्यांनी बैठक बोलाविली आहे. या चारही मतदारसंघांतील आमदारांनी आघाडी सरकारशी फारकत घेऊन राजीनामे दिले आहेत. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा देवेगौडा यांचा प्रयत्न आहे. 

राज्याच्या वित्त विधेयकाला आपला पाठिंबा आहे. जेडीएसला संपविणे कोणालाच शक्‍य नाही. सरकार गेले तरी काळजी करण्याचे कारण नाही; परंतु पक्ष टिकला पाहिजे. बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर विधानसभाध्यक्ष निर्णय देतील. त्यानंतर पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. 

- एच. डी. देवेगौडा, माजी पंतप्रधान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: JDS may Supports BJP Government in Karnataka