संयुक्त जनता दल आजच्या बंदपासून दूर

पीटीआय
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

पाटणा - केंद्राच्या एक हजार आणि पाचशेच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिल्याने आज (ता. 28) आयोजित केलेल्या बंदपासून आणि 30 नोव्हेंबरला तृणमूल कॉंग्रेसने आयोजित केलेल्या धरणे आंदोलनापासून संयुक्त जनता दलाने दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

पाटणा - केंद्राच्या एक हजार आणि पाचशेच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिल्याने आज (ता. 28) आयोजित केलेल्या बंदपासून आणि 30 नोव्हेंबरला तृणमूल कॉंग्रेसने आयोजित केलेल्या धरणे आंदोलनापासून संयुक्त जनता दलाने दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

आम्ही केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले असून, उद्याच्या बंदमध्ये आम्ही कसे सहभागी होऊ, असा प्रतिप्रश्‍न संयुक्त जनता दलाचे बिहारचे अध्यक्ष बशिष्ट नारायण सिंह यांनी आज केला. काळा पैसा बाहेर आणण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने 500 आणि हजारच्या नोटा बंद केल्याच्या निर्णयाविरोधात विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या बंदबाबत निर्णय घेण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्ष नितीशकुमार यांनी शनिवारी सायंकाळी आयोजित केलेल्या उच्चस्तरीय बैठकीला सिंह उपस्थित होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नितीशकुमार होते. त्याशिवाय पक्षाचे वरिष्ठ नेते के. सी. त्यागी, आर.सी.पी. सिंग, हरिवंश आदी उपस्थित होते.

नोटाबंदीच्या विरोधात उद्या आयोजित केलेल्या बंदपासून स्वतःला दूर ठेवणाऱ्या संयुक्त जनता दलाने बुधवारी बिहारमध्ये तृणमूल कॉंग्रेसने आयोजित केलेल्या आंदोलनातही सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 30 नोव्हेंबर रोजी ममता बॅनर्जी यांनी पाटण्यात आयोजित केलेल्या आंदोलनातही संयुक्त जनता दल सहभागी होणार नसल्याची माहिती पक्षाचे महासचिव के. सी. त्यागी यांनी दिली.

या नोटाबंदीच्या निर्णयाबाबत आमची एक भूमिका असून आम्ही त्याचे समर्थनही केले आहे, त्यामुळे आम्ही त्याच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनात कसे सहभागी होऊ शकतो, असा सवाल त्यागी यांनी केला. या नोटाबंदीच्या विरोधात ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेण्यापूर्वी नितीशकुमार यांनी त्यांच्याशी चर्चा करून याबाबत भेटीआधी पूर्ण विचार करण्यास सांगितले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: JDU distinguished from Bandha