झाशीच्या राणीमुळे माझा मुलगा पाकमधून आला...

वृत्तसंस्था
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या झाशीच्या राणी होत्या. त्यांच्यामुळेच माझा मुलगा पाकिस्तानच्या कारागृहामधून भारतात परतला आहे.

मुंबईः भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या झाशीच्या राणी होत्या. त्यांच्यामुळेच माझा मुलगा पाकिस्तानच्या कारागृहामधून भारतात परतला आहे. त्यांनी माझ्या कुटुंबाला मोठा आधार दिला आहे, अशा शब्दांमध्ये पाकिस्तानमधून भारतात परतलेला युवक हमीद अन्सारी याची आई फौजिया यांनी प्रतिक्रया दिली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (वय 67) यांचे मंगळवारी (ता. 6) रात्री हृदय विकाराने निधन झाले. सुषमा स्वराज यांचे निधन झाल्याची माहिती समजल्यानंतर अनेकजण हळहळत आहेत. परदेशात अडकलेल्या अनेकांना त्यांनी मदत केली आहे. सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नामुळे अन्सारीची पाकिस्तानमधून 6 वर्षानंतर सुटका झाली होती.

मुंबईतील हमीद अन्सारी हा युवकही सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण करताना भावूक झाला होता. अन्सारी म्हणाला, 'सुषमा स्वराज यांच्याबद्दल प्रचंड आदर असून, माझ्या हृदयात त्या नेहमी जिवंत राहतील. स्वराज माझ्या आईसारख्या होत्या. पाकिस्तानमधून परतल्यानंतर त्यांनी मार्गदर्शन केले होते. स्वराज यांचं निधनाने माझे मोठे नुकसान झाले आहे. एकप्रकारे माझे मातृछत्रच हरपले आहे.’

सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नामुळे हमीद अन्सारी डिसेंबर 2018 मध्ये भारतात परतला होता. हमीद अन्सारीची सुटका होण्यासाठी त्याच्या कुटुंबियानी आठ वेळा सुषमा स्वराज यांची भेट घेतली होती. प्रत्येक वेळी त्यांनी आधार दिला होता. त्यांच्या विषयी बोलताना अश्रूंशिवाय माझ्याजवळ शब्दच नाहीत. त्या झाशीच्या राणी होत्या, असे फौजिया यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अन्सारीची फेसबुकवरून एका पाकिस्तानी तरुणीशी ओळख झाली होती. त्यानंतर तो तिच्या प्रेमात पडला. तिला भेटण्यासाठी तो आतूर झाला होता. त्याने आपल्याला अफगाणिस्तानात काम मिळाल्याचे घरच्यांना सांगितले आणि तो तिला भेटण्यासाठी पहिल्यांदा अफगाणिस्तानला गेला त्यानंतर तिथून तो पाकिस्तानात पोहोचला होता. पाकिस्तानी सैन्याने हेरगिरीच्या आरोपखाली त्याला ताब्यात घेतले होते. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने त्याच्यावर खटला भरला आणि त्याला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jhansi ki rani who saved my son from pak jail says fauzia Ansari