झारखंडमध्ये चारही विभागांतील महत्त्वाच्या जागा भाजपने गमावल्या

उज्ज्वल कुमार
Wednesday, 25 December 2019

छोटा नागपूरमधून ‘बडा’ विजय
छोटा नागपूर विभागातही भाजप चमकदार यश कामगिरी करू शकलेला नाही. २०१४ मधील निवडणुकीत येथील सुमारे २६ जागांपैकी १५ भाजपला मिळाल्या होत्या. यंदा हे यश ११ जागांपुरतेच मर्यादित राहिले. दुसरीकडे ‘जेएमएम’च्या खात्यात यंदा नऊ जागांची भर पडली आहे. गेल्या वेळी ‘जेएमएम’ला या भागात तीनच जागांवर समाधान मानावे लागले होते. यंदा त्यांनी घवघवीत यश मिळवून तब्बल १२ जागांवर विजयाचा झेंडा फटकाविला आहे.

पाटणा - झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाने (जेएमएम) काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या सहकार्याने सत्ताधारी भाजपला धूळ चारल्याने कमळ कोमजले. राज्याचे चार विभाग केले तर तेथे सर्व ठिकाणी भाजपला विरोधी पक्षांपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जमशेदपूर शहरातील दोन्ही मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. पूर्व जमशेदपूर मतदारसंघात खुद्द मुख्यमंत्री रघुवर दास यांना भाजपचे बंडखोर नेते शरयू राय यांच्याकडून हार पत्करावी लागली.  झारखंडचे भौगोलिक क्षेत्र चार हिश्‍श्‍यात विभागले गेले आहे. कोल्हान, संताल परगणा कोयलांचल आणि छोटा नागपूर या चार विभागांत झारखंड सामवला आहे. जमशेदपूरचा समावेश कोल्हानमध्ये होतो. या क्षेत्रात विधानसभेचे १४ मतदारसंघ आहेत. या पैकी एकाही जागेवर भाजप विजय मिळवू शकला नाही.  येथे या वेळी ‘जेएमएम’च्या जागांमध्ये वाढ झाल्याचे कारण म्हणजे या भागातील कारखान्यांवरील मंदीचे सावट असल्याचे जाणकार सांगतात. जमशेदपूरमध्ये टाटांच्या कारखान्यांत गेल्या काही दिवसांपासून काम बंद आहे. त्याचा परिणाम तेथील जनतेवर झाला आहे. रघुवर दास हेही पूर्वी ‘टिस्को’मध्ये कामगार होतो. 

Flashback 2019: भारतात कोण उद्योगपती झाला वर्षभरात मालामाल?

संताल परगण्यातही भाजपला दोन जागा गमवाव्या लागल्या आहेत. या भागात एकूण १८ जागा आहेत. या वेळच्या निवडणुकीत पाच ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले. गेल्या वेळी त्यांना सात ठिकाणी यश मिळाले होते. गेल्या निवडणुकीत महाआघाडीला येथून १२ जागा मिळाल्या होत्या. कोयलांचलमध्ये १६ विधानसभा मतदारसंघ आहेत. येथे ‘जेएमएम’ला चार आणि काँग्रेसला तीन जागांवर विजय मिळाला. भाजपच्या पदरी केवळ सहाच जागा आल्या. कोयलांचलमधील एका मतदारसंघावर वर्चस्व राखण्यात कम्युनिस्ट पक्ष यशस्वी ठरला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jharkhand vidhansabha election 2019 result BJP loss politics