JNU Controversy : ‘जेएनयू’ वादाप्रकरणी चौकशीचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

JNU Controversy

JNU Controversy : ‘जेएनयू’ वादाप्रकरणी चौकशीचे आदेश

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) आवारातील अनेक भिंतींवर ब्राह्मण व वैश्य समाजांच्या विरोधात घोषणा लिहिल्याचे प्रकरण तापले आहे. जेएनयू प्रशासनाने या घटनेचा निषेध केला असून संबंधित विभागाला या प्रकाराची चौकशी करून त्वरित अहवाल देण्याचे निर्देश कुलगुरू शांतीश्री पंडित यांनी दिले आहे.

‘जेएनयू’च्या आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्राच्या (स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज) इमारतीतील भिंती काही जातींच्या विरोधातील घोषणांनी विद्रूप केल्याचे निदर्शनास आल्यावर दिल्लीतील विद्यापीठे व महाविद्यालयीन वर्तुळात तणावाचे वातावरण आहे. विद्यापीठ परिसरात काही अज्ञात घटकांनी आवाराच्या भिंती आणि प्राध्यापकांच्या खोल्या विद्रुप केल्याच्या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. प्रशासनाने घटनेची दखल घेत या प्रकरणी संबंधित विभागाचे प्रमुख आणि तक्रार समितीला चौकशी करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्यास कुलगुरूंनी सांगितले आहे, असे ‘जेएनयू’ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

‘जेएनयू’ म्हणजे समावेश आणि समानता आहे. या आवारातील अशा कोणत्याही प्रकारचे हिंसाचारी कृत्य सहन केला जाणार नाही, याचाही पुनरुच्चार निवेदनात करण्यात आला आहे. जेएनयूतील नलिनकुमार महापात्रा, राज यादव, प्रवेश कुमार आणि वंदना मिश्रा यांच्यासह अनेक प्राध्यापकांच्या दालनांच्या भिंतींवरही ‘(संघ)शाखेकडे परत जा’ असे लिहिल्याचे आढळले होते.

डाव्या संघटनांवर आरोप

जेएनयू शिक्षक संघटनेने भिंतींच्या विद्रुपीकरणाचा निषेध करणारे ट्विट करताना या प्रकारासाठी ‘डावे-उदारमतवादी टोळी’ च जबाबदार असल्याचेही म्हटले आहे. ‘अभाविप’नेही या प्रकाराबद्दल डाव्या संघटनांवर आरोप केले आहेत. ‘शैक्षणिक संस्थांचे आवार वादविवाद व चर्चेसाठीच वापरले गेले पाहिजे. समाज व विद्यार्थी समुदायामध्ये विष पसरवण्यासाठी विद्यापीठाच्या भिंती नाहीत,’ असे ‘अभाविप’चे अध्यक्ष रोहित कुमार यांनी म्हटले आहे.