esakal | जस्टीस एन. व्ही रमणा भारताचे 48 वे सरन्यायाधीश; राष्ट्रपतींनी दिली पदाची शपथ

बोलून बातमी शोधा

जस्टीस एन. व्ही रमणा भारताचे 48 वे सरन्यायाधीश; राष्ट्रपतींनी दिली पदाची शपथ

जस्टीस एन. व्ही रमणा भारताचे 48 वे सरन्यायाधीश; राष्ट्रपतींनी दिली पदाची शपथ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : भारताचे 48 वे सरन्यायाधीश म्हणून न्या. नुथालापती व्यंकट रमणा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून त्यांना सरन्यायाधीश पदाची शपथ आज देण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनामध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पंतप्रधान मोदींसह महत्त्वाचे मान्यवर उपस्थित होते. रमणा हे ऑगस्ट २०२२ पर्यंत ह्या पदावर असणार आहे. सरन्यायाधीश म्हणून मागील दशकभराचा विचार करता त्यांना सर्वाधिक काळ मिळणार आहे. रमणा यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पोन्नावरम नावाच्या खेड्यात शेतकरी कुटुंबात झाला. घरात कुठलाही वकिलीचा वारसा नसतांना ते या पदापर्यंत पोहचले आहेत. एनव्ही रमणा यांचा जन्म २७ ऑगस्ट १९५७ रोजी एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला. आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पोन्नावरम हे त्यांचे मूळ गाव. पूर्ण वेळ वकिली करण्यापूर्वी रमणा यांनी काही काळ एका तेलुगू दैनिकात पत्रकार म्हणून देखील काम केले होते.

कोण आहेत जस्टीस रमणा?

 • रमणा हे मागील चार दशकांपासून कायदा आणि न्यायव्यवस्थेचा भाग आहेत.

 • दोन उच्च न्यायालये, सर्वोच्च न्यायालय, विविध प्रशासकीय लवाद, विविध सरकारी संघटनांमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून त्यांनी काम

 • राज्यघटना, गुन्हेगारी, सेवा आणि आंतरराज्य नदी कायदे आदींवर त्यांचे विशेष प्रभुत्व

 • १९८३ मध्ये आंध्रप्रदेश उच्च न्यायालयातून पूर्णवेळ वकिली करायला सुरुवात

 • केंद्रीय तसेच आंध्रप्रदेश प्रशासकीय लवाद आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील दिवाणी, फौजदारी, घटनात्मक, कामगार, सेवा आणि निवडणुकीशी संबंधित खटल्यांमध्ये देखील विधिज्ञ म्हणून काम पाहिले

 • केंद्र सरकारसाठी त्यांनी अतिरिक्त स्थायी सल्लागार म्हणून देखील काम पाहिले.

 • हैदराबादेत काहीकाळ केंद्रीय प्रशासकीय लवादामध्ये भारतीय रेल्वेचे कायदा सल्लागार

 • याचवेळी आंध्रप्रदेश सरकारची अतिरिक्त ॲडव्होकेट जनरल पदाची देखील जबाबदारी

 • २००० मध्ये आंध्रप्रदेश उच्च न्यायालयात पूर्णवेळ न्यायाधीश

 • दिल्लीला मुख्य न्यायाधीश म्हणून बदली आणि त्यानंतर दुसऱ्याच वर्षी सर्वोच्च न्यायालयामध्ये नियुक्ती

सर्वोच्च न्यायालयात

रमणा हे १७ फेब्रुवारी २०१४ पासून सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. २७ फेब्रुवारी २०१९ पासून त्यांनी राष्ट्रीय कायदा सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले. यंदा ६ एप्रिल रोजी मावळते सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी सरन्यायाधीशपदासाठी रमणा यांच्या नावाची शिफारस केली होती.

महत्त्वाचे निवाडे

 1. जम्मू- काश्‍मीरमधील इंटरनेटवरील बंदी उठविणे

 2. सरन्यायाधीशांचे कार्यालय आरटीआयच्या कक्षेत आणणे

 3. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात बहुमत चाचणीचे निर्देश