
K Chandrashekar Rao : आमदार खरेदीचा सीबीआय तपास
हैदराबाद : तेलंगण उच्च न्यायालयाने आमदारांच्या कथित खरेदी प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्याचा निर्णय घेतल्याने मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
या प्रकरणामध्ये सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचे चार आमदार आणि एका व्यक्तीचा समावेश आहे. राज्य सरकारने नेमलेले विशेष तपास पथक देखील उच्च न्यायालयाने बरखास्त केले आहे. भाजपचे नेते आणि विधिज्ञ रामचंद्र राव यांनी न्यायालयाच्या ताज्या निकालाचे स्वागत केले आहे. सायबराबाद पोलिसांनी मोईनाबाद येथील एका फार्म हाउसवर छापा घातला होता.
राज्यातील भारत राष्ट्रसमितीचे सरकार पाडण्यासाठी चार आमदारांची खरेदी करता यावी म्हणून प्रत्येकाला शंभर कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. तंदूर येथील आमदार रोहित रेड्डी यांनी आपल्याला पक्ष सोडण्यासाठी पैशांची ऑफर देण्यात आली असल्याचे म्हटले होते.
मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांनी देखील भाजप आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केल्याने वातावरण आणखी तापले होते. त्यांच्याच पक्षाचे आमदार असलेल्या रेड्डी यांनी सक्तवसुली संचालनालय (ईडी) या प्रकरणात सहभागी असून देखील त्याचा तपास करत नसल्याचे म्हटले होते. भाजपने मात्र या सगळ्यांचे सूत्रधार राज्याचे मुख्यमंत्री असल्याचा आरोप करून बॉम्ब फोडला होता. तसेच या प्रकरणातील तीन आरोपींशी आपला संबंध नसल्याचेही म्हटले होते.