कमलनाथ सरकार पाडण्यात पंतप्रधान मोदींची महत्त्वाची भूमिका, भाजपच्या दिग्गज नेत्याचा दावा

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 17 December 2020

याचवर्षी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे मार्च महिन्यात कमलनाथ सरकार पडले होते. त्यानंतर शिवराज सरकार सत्तेवर आले होते. 

इंदूर- भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय आणि वाद यांचे घनिष्ठ नाते आहे. कैलाश विजयवर्गीय हे आपल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी आपल्या वक्तव्यामुळे पक्षालाही अडचणीत आणले आहे. मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकार पाडण्यात केंद्रीय मंत्री धर्मेंद प्रधान यांची काहीच भूमिका नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच हे सर्व घडवले होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट विजयवर्गीय यांनी केला आहे. 

देशात नव्या कृषी कायद्यावरुन विविध ठिकाणी आंदोलन केले जात आहे. भाजपने मंगळवारी इंदूरमध्ये कृषी कायद्याच्या समर्थनात कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी कैलाश विजयवर्गीय बोलत होते. ते म्हणाले की, आज मी एक असा खुलासा करत आहे की, ज्याची माहिती कोणालाच नव्हती. कमलनाथ सरकार पाडण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच महत्त्वाची भूमिका बजावली होती. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काहीच केले नव्हते. 

हेही वाचा- जिओची जाहिरात करणारे मोदी एकमेव पंतप्रधान; नवज्योतसिंग सिद्धूंची सडकून टीका

ही बातमी सर्वदूर पसरताच विजयवर्गीय यांनी याबाबत लगेच स्पष्टीकरणही दिले. ते म्हणाले की, मी मस्करी करतोय, हे तेथे उपस्थित असलेल्या लोकांना माहीत होते. ही गोष्ट मी गंमतीने सांगितली होती. विशेष म्हणजे याचवर्षी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे मार्च महिन्यात कमलनाथ सरकार पडले होते. त्यानंतर शिवराज सरकार सत्तेवर आले होते. 

दरम्यान, यावर्षी मार्चमध्ये एकेकाळी काँग्रेसचे दिग्गज आणि विश्वासू नेते राहिलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या 22 निष्ठावान आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामध्ये सहा मंत्र्यांचाही समावेश होता. शिंदे यांच्या बंडामुळे मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकार संकटात आले होते. सुमारे 15 महिन्यांत कमलनाथ सरकार कोसळले होते. 

हेही वाचा- मोदी सरकारने कौर्याच्या मर्यादा ओलांडल्या, बाबा रामसिंग यांच्या आत्महत्येनंतर राहुल गांधी संतापले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kailash Vijayvargiya claims that PM Modi Played Key Role in revoke Kamal Nath Govt in Madhya Pradesh