कमलनाथांची आज ‘सत्त्वपरीक्षा’

पीटीआय
Monday, 16 March 2020

काँग्रेस आमदार परतले
अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या एक दिवस आधी जयपूर येथे असलेले काँग्रेसचे आमदार भोपाळमध्ये परतले आहेत. काँग्रेसने सर्व आमदारांना हजर राहण्यासाठी व्हिप जारी केला आहे.  भाजपनेही आपल्या आमदारांना व्हिप जारी केला आहे. मात्र हरियानामध्ये तळ ठोकून असलेले त्यांचे आमदार अद्याप परतलेले नाहीत.

राज्यपालांच्या सूचना

  • मतांची विभागणी करून हे मतदान होईल
  • सर्व प्रक्रियेचे चित्रीकरण होणार
  • विश्‍वासदर्शक ठरावाची सर्व प्रक्रिया उद्याच्या उद्याच पूर्ण होणे आवश्‍यक असून, ती स्थगित अथवा निलंबीत करता येणार नाही.

भोपाळ - मध्य प्रदेशमध्ये बावीस आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर अडचणीत आलेल्या मुख्यमंत्री कमलनाथ सरकारला उद्या (ता. १६) विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल लालजी टंडन यांनी दिले आहेत. उद्या राज्याचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू होत असून, राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विश्‍वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ज्योतिरादित्य शिंदे समर्थक बावीस आमदारांनीही राजीनामे दिल्याने काठावर बहुमत असलेले काँग्रेस सरकार अडचणीत आले. या बावीस आमदारांमध्ये सहा मंत्र्यांचाही समावेश आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपवर घोडेबाजार करत असल्याचा आरोप करत विश्‍वासदर्शक ठरावासाठी तयार असल्याचे आव्हान दिले होते. या पार्श्‍वभूमीवर, राज्यपालांनी काल रात्री मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले.

संसर्गाचा एकत्रित मुकाबला करू; सार्क देशांच्या व्हीसीत पंतप्रधान मोदींचा निर्धार 

‘विश्‍वासदर्शक ठरावासाठी तयार आहोत असे तुम्ही (कमलनाथ) दिलेल्या पत्रामध्ये नमूद केले होते. भाजपनेही या परिस्थितीबाबत मला पत्र लिहीत राजीनामा दिलेल्या आमदारांवर राज्य सरकारकडून अनावश्‍यक दबाव टाकला जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. वरील माहिती पाहता, तुमच्या सरकारने विधानसभेत विश्‍वास गमावला असून, ते अल्पमतात आले असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. हा अत्यंत गंभीर मुद्दा असल्याने राज्यघटनेतील तरतुदीनुसार आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी तुम्ही १६ मार्चला बहुमत चाचणीस सामोरे जाणे आवश्‍यक आहे,’ असे राज्यपालांनी पत्रात म्हटले आहे.  बावीस आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिल्याचे आणि माध्यमांनाही तसे कळविल्याचे मला समजले आहे. त्यांनी मलाही स्वतंत्र पत्र पाठविले असून, विधानसभा अध्यक्षांसमोर समक्ष हजर राहात राजीनामा देण्यासाठी सुरक्षेची मागणी केली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kamalnath Government Issue in Madhyapradesh Politics