संसर्गाचा एकत्रित मुकाबला करू; सार्क देशांच्या व्हीसीत पंतप्रधान मोदींचा निर्धार 

modi
modi

नवी दिल्ली - वैश्‍विक संकट बनलेल्या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेच्या (सार्क) देशांना एकत्र येण्याचे आवाहन केले. या लढाईसाठी भारताचा पुढाकार दर्शविताना मोदींनी एक कोटी डॉलरचे अर्थसाहाय्यदेखील जाहीर केले. सर्व देशांनी भारताच्या या पुढाकाराचे स्वागत करताना संपूर्ण सहकार्याची ग्वाही दिली. पाकिस्तानने मात्र या संवेदनशील विषयावरही हीन राजकारण करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान इम्रान खान यांनी या संवाद सत्राकडे पाठ फिरवली, तर पाकिस्तानी प्रतिनिधींनी काश्‍मीरमधील निर्बंध हटविण्याची मागणी केली. 

कोरोनाला सक्षमपणे तोंड कसे देता येईल, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सार्कचे सदस्य असणाऱ्या नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान, भूतान, श्रीलंका, मालदीव आणि पाकिस्तान या देशांच्या प्रमुखांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी) संवाद साधला. भारताच्या या पुढाकाराचे पाकिस्तान वगळता सर्व देशांनी तोंडभरून कौतुक केले. तर वुहानमधून भारतीयांसोबतच आपल्या नागरिकांनाही बाहेर काढण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांचे बांगलादेश, मालदीव या देशांनी विशेष आभार मानले. 

दीडशे प्रकरणे उघड 
परिषदेच्या प्रारंभी बोलताना मोदींनी कोरोनावर भारतात सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. सार्क देशांमध्ये कोरोनाची १५० प्रकरणे समोर आली आहेत. अर्थात, यामुळे घाबरून न जाता सावध राहण्याची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन मोदींनी केले. या जीवघेण्या संकटाला तोंड देण्यासाठी सर्व देशांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज व्यक्त करताना मोदींनी विशेष आकस्मिक निधी उभारण्याचाही प्रस्ताव दिला. या निधीमध्ये भारत एक कोटी डॉलरचे अर्थसाहाय्य देईल. हा निधी कोणालाही वापरता येईल, असेही त्यांनी सांगितले. कोरोनाने विकसनशील देशांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे, याकडे लक्ष वेधताना पंतप्रधान मोदींनी कोरोनाच्या चाचणीसाठी उपकरण संच तसेच तत्काळ प्रतिसादासाठी अत्यावश्‍यक उपकरणे, यंत्रसामग्रीसह भारतीय डॉक्‍टरांचे पथक तयार केले जात आहे, असेही असे सांगितले. 

मोदींचे आभार 
भूतानचे पंतप्रधान डॉ. लोते त्शेरिंग यांनी पंतप्रधान मोदींच्या पुढाकाराची प्रशंसा करताना सार्क देशांच्या मदतीसाठी आकस्मिक निधी उभारणीच्या प्रस्तावाचेही स्वागत केले. संपूर्ण जग या संकटाला तोंड देत असताना आपसातील मतभेद बाजूला ठेवण्याची गरजी त्यांनी व्यक्त केली, तर नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनीही मोदींच्या या प्रयत्नांचे स्वागत केले. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी अशाच प्रकारे तांत्रिक सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगताना सार्क देशांचे आरोग्यमंत्री, आरोग्य सचिव तसेच वैद्यकीय तज्ज्ञांच्या एकत्रित संवादाची आवश्‍यकता बोलून दाखविली. बांगलादेशच्या २३ विद्यार्थ्यांना भारताने वुहानमधून परत आणल्याबद्दल शेख हसिना यांनी मोदींचे या वेळी आभार मानले. 

पाकचा राग काश्‍मिरी 
अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्याचे टाळून आरोग्य खात्याचे उपमंत्री जफर मिर्झा यांना पाठविले होते. जगभरात १३८ देशांमध्ये दीड लाखांवर संसर्गग्रस्त नागरिक आणि सुमारे सहा हजार मृत्यू पाहता कोणत्याही देशाला याकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही, अशी चिंता व्यक्त करताना जफर मिर्झा यांनी काश्‍मीर रागही आळवला. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासासाठी जम्मू-काश्‍मीरमधील सर्व निर्बंध भारताने हटवावे, अशी मागणी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com