esakal | कर'नाटक'चे नाट्य आज संपणार; कुमारस्वामींचे भवितव्य ठरणार
sakal

बोलून बातमी शोधा

कर'नाटक'चे नाट्य आज संपणार; कुमारस्वामींचे भवितव्य ठरणार

युती सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाचे नाट्य सोमवारी रात्री प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढवत राहिले. अखेर रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी अध्यक्षांनी कामकाज मंगळवारी (ता.23) सकाळी दहापर्यंत स्थगित केल्याचे जाहीर केले आणि आजच्या दिवसापूरता या नाट्यावर पुन्हा एकदा पडदा पडला.

कर'नाटक'चे नाट्य आज संपणार; कुमारस्वामींचे भवितव्य ठरणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : युती सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाचे नाट्य सोमवारी रात्री प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढवत राहिले. अखेर रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी अध्यक्षांनी कामकाज मंगळवारी (ता.23) सकाळी दहापर्यंत स्थगित केल्याचे जाहीर केले आणि आजच्या दिवसापूरता या नाट्यावर पुन्हा एकदा पडदा पडला. त्यामुळे आज कर्नाटकमधील सत्ता नाट्यावर पडदा पडणार आहे.

मंगळवारी कामकाज घेण्याची मागणी करत केलेला गदारोळ सत्ताधाऱ्यांच्या पथ्थ्यावर पडला. तर भाजपने आजच कितीही वेळ लागला तरी कामकाज चालवण्याची केलेली विनंती अध्यक्षांनी नजरेआड केली. त्याचवेळी अध्यक्षांनी सत्ताधाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत उद्या चारपर्यंत चर्चा तर सहापर्यंत मतदान घेण्याचा निर्णय घेतला. तसेच उद्या सहा वाजल्यानंतर एकही मिनिट थांबणार नसल्याचा कडक इशारा दिला. 

अध्यक्षांनी कामकाज स्थगित करताना उद्या सकाळी दहाची वेळ देताच सत्ताधारी आमदारांनी त्यावर गदारोळ केला. आता वेळ झाला असून उद्या सायंकाळी थेट चार वाजताच कामकाज सुरू करण्याची मागणी केली. पण, अध्यक्षांनी ती धुडकावून लावली. शिवाय चार वाजेपर्यंत मतदान घेण्याचेही बजावले. पण, कॉंग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी अखेरीस अध्यक्षांना विनंती करून चारपर्यंत सर्व चर्चा संपवून पाच वाजता आमचे मुख्यमंत्री कुमारस्वामी सभागृहाला उद्देशून बोलतील. त्यानंतर सहा वाजता मतदान घेण्याची विनंती केली. त्याला विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. मात्र, अध्यक्षांनी सहापर्यंत उद्याच मतदान होणार, असे ठणकावून कामकाज स्थगित केले. 

तत्पूर्वी सायंकाळी सहापासून निर्णय घेण्यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांशी सभाध्यक्ष रमेशकुमार यांनी चर्चा केली. त्यानंतर तहकूब सभागृह रात्री साडे आठ वाजता पुन्हा सुरू झाले. युतीच्या आमदारांनी चर्चा शिल्लक असून ती उद्या (मंगळवारी) करावी अशी मागणी केली तर भाजपने कितीही वेळ झाला तरी चालेल चर्चा आजच संपवून रात्रीच मतदान घेण्याचा आग्रह धरला. सभाध्यक्षांनीही मीही ठराव घेण्यास तयार असल्याचे सांगितले. पण, रात्री उशिरापर्यंत चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच राहिले. 

शुक्रवारी मुख्यमंत्री कुमारस्वामी व विधिमंडळ पक्षाचे नेते सिध्दरामय्या यांनी सोमवारपर्यंत विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यास वेळ देण्याची विनंती केली होती. सभाध्यक्षांनी ती मान्यही केली होती. त्यानुसार आज (रा.22) सकाळी उशीराच विधिमंडळाच्या कामकाजाला सुरवात झाली. दिवसभर विश्वासदर्शक ठरावावर सुरळीतपणे चर्चा झाली. परंतु सायंकाळी सहाच्या सुमारास कॉंग्रेस व धजदच्या सदस्यांनी पुन्हा एक दिवस वाढवून देण्याची मागणी केली. परंतु सभाध्यक्ष आपल्या निर्णयावर ठाम होते. कोणत्याही परिस्थित आजच मतदान घेण्यास त्यांनी युतीच्या नेत्यांना बजावले. 

अध्यक्ष मुदत देण्यास तयार नसल्याचे स्पष्ट होताच कॉंग्रेस व धजदचे सदस्य घोषणा देत सभाध्यक्षांच्या आसनासमोर आले. विरोधी भाजपनेही त्यांच्या विरोधी घोषणा दिल्या. त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. दहा मिनिटांसाठी अधिवेशन तहकूब करण्यात आले होते परंतु अडीच तास झाला तरी पुन्हा सभागृह सुरूच झाले नाही. रात्री दोन्ही पक्ष नेत्यांशी चर्चा करून सभागृह सुरू झाले पण ते चर्चेतच राहिले. 

राज्यापालांना माहिती 
विधिमंडळाच्या कामकाजाचे निरिक्षण करणाऱ्या राजभवनाच्या अधिकाऱ्यांनी चालू घडामोडीचा अहवाल राज्यापालांना रात्री सव्वा आठ वाजता पाठविल्याचे समजते. या अहवालाच्या आधारे राज्यापाल केंद्रीय गृहमंत्रालयाला आपला आदेश पाठविणार असल्याचे वृत्त आहे.
 
भोजनाच्या सुटीनंतर मुख्यमंत्री गैरहजर 
दुपारी दीड वाजता भोजनासाठी सुटी दिल्यानंतर सभागृहातून गेलेले मुख्यमंत्री सायंकाळपर्यंत सभागृहात आले नव्हते. मुख्यमंत्री साडे आठ वाजरा पुन्हा सभागृहात आले. त्यानंतर त्यांनी बोलण्यास उभे राहिल्यानंतर भाजपचे आमदार मधुस्वामी व त्यांच्यात खडाजंगी झाली. 

डी. कें. चा इशारा 
सभागृहात बोलताना मंत्री डी. के. शिवकुमार यांनी बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा आवाहन केले. कारवाई होण्यापूर्वी पक्षात या. सभाध्याक्षांच्या आदेशानुसा पक्षाच्या नेत्याला व्हीप लावण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता परत येण्याचे आवाहन केले. 

loading image