

Karnataka Drug Price Disparity
esakal
बंगळूर : औषधांची मूळ खरेदी किंमत आणि त्यावर छापण्यात आलेल्या कमाल किरकोळ किमतीत (एमआरपी) मोठी तफावत असल्याचे कर्नाटक अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) तपासणीत उघड झाले आहे. तब्बल २५४ औषध उत्पादक कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये ६० ते ९० पटांपर्यंत दरवाढ आढळल्याचा दावा एफडीएने केला आहे. विशेषतः कर्करोगासह गंभीर आजारांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या महागड्या औषधांमध्ये ही तफावत आढळल्याने रुग्णांच्या आर्थिक भाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
एफडीएच्या तपासणीत केवळ ८६ रुपयांना खरेदी केलेल्या एका औषधावर तब्बल ४, २२८ रुपयांची एमआरपी छापण्यात आल्याचे आढळले. तसेच १६० रुपयांना खरेदी केलेल्या दुसऱ्या औषधाची एमआरपी ७, ११० रुपये असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे औषधांच्या प्रत्यक्ष खरेदी किमती आणि रुग्णांकडून आकारल्या जाणाऱ्या किमतीमध्ये मोठी तफावत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दर नियंत्रणाच्या कक्षेबाहेर असलेल्या काही औषधांवर मोठ्या प्रमाणात ट्रेड मार्जिन आकारले जात असल्याचेही तपासणीत निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर अशा उत्पादनांच्या किमतीवर नियंत्रण आणण्याची मागणी एफडीएने केली आहे. बनावट औषध प्रकरणानंतर कारवाईला वेग दरम्यान, अलीकडेच बंगळूरजवळील बिडदी परिसरातील एका फार्महाऊसमध्ये कमी किमतीची औषधे पुन्हा पॅक करून बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या महागड्या ब्रँडची बनावट लेबले लावण्याचा प्रकार एफडीएने उघडकीस आणला होता.
या प्रकरणात सुमारे ५.०५ कोटी रुपयांचा औषधसाठा आणि संबंधित व्यवहार समोर आला होता. या कारवाईनंतर राज्यभर तपास मोहीम राबविण्यात आली. आतापर्यंत १६ औषध परवाने रद्द करण्यात आले असून, आठ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. आता औषधांच्या किमतीतील मोठ्या तफावतीचीही तपासणी करण्यात आल्याने औषध विक्रीतील दररचनेवर लक्ष केंद्रित झाले आहे.
केंद्राशी पत्रव्यवहार कर्नाटक एफडीएचे आयुक्त के. श्रीनिवास यांनी औषधांच्या ट्रेड मार्जिनवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाकडे तसेच केंद्रीय औषध नियंत्रण संस्थेकडे पत्रव्यवहार केला आहे. संबंधित २५४ कंपन्यांच्या उत्पादनांच्या किमतींचे परीक्षण करून आवश्यक ती दरनियंत्रणाची कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
८६ रुपये खरेदी किमतीच्या औषधाची एमआरपी ४, २२८ १६० रुपये औषधाची एमआरपी ७, ११० २५४ औषध उत्पादक कंपन्यांच्या उत्पादनांची तपासणी काही उत्पादनांमध्ये ६० ते ९० पट दरतफावत आढळल्याचा एफडीएचा दावा ट्रेड मार्जिनवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्राकडे मागणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.