ब्रेकिंग न्यूजः कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती एसएल धर्मगौडा यांची आत्महत्या

सकाळ ऑनलाइन टीम
Tuesday, 29 December 2020

चिकमंगळूरमधील कडूर येथील रेल्वे मार्गावर त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. धर्मगौडा यांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोटही आढळून आल्याचे सांगण्यात येते.

बंगळुरु- कर्नाटकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जेडीएसचे नेते तथा कर्नाटक विधान परिषदेचे उपाध्यक्ष एसएल धर्मगौडा यांनी आत्महत्या केली आहे. चिकमंगळूरमधील कडूर येथील रेल्वे मार्गावर त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. धर्मगौडा यांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोटही सापडल्याचे सांगण्यात येते. अत्यंत शांत आणि सौम्य प्रवृत्तीचे असलेले धर्मगौडा यांच्या आत्महत्येमुळे आपल्याला धक्का बसल्याची प्रतिक्रिया जेडीएसचे नेते तथा माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी दिली आहे. त्यांच्या मृत्यूमुळे कर्नाटकचे मोठे नुकसान झाल्याचेही ते म्हणाले. 

धर्मगौडा हे सोमवारी सायंकाळी सुमारे 7 च्या सुमारास आपल्या कारने एकटचे बाहेर गेले होते. परंतु, रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नव्हते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरु केला आणि याची पोलिसांना ही माहिती दिली. परिसरात शोध घेऊनही ते सापडले नाहीत. पोलिस शोध घेत रेल्वे ट्रॅकजवळ गेल्यानंतर त्यांना तिथे धर्मगौडा यांचा मृतदेह आढळून आल्याचे सांगण्यात येते.

 

धर्मगौडा यांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु, अद्याप याला दुजोरा मिळू शकलेला नाही. घटनास्थळी एक सुसाईड नोटही मिळाली आहे. अद्याप कारण समजू शकलेले नाही. सध्या पोलिस तपास करत आहेत.  

विशेष म्हणजे 15 डिसेंबरला कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती एसएल धर्मगौडा यांना सभापती आसनावरुन बळजबरीने उतरवण्यात आले होते. सभागृहात गोंधळ सुरु असतानाच भाजप-जेडीएस आणि काँग्रेसच्या सदस्यांनी अपशब्दांचा वापर केला होता. एकमेकांना धक्का देत सभापती आसनावर बसलेले उपसभापती एसएल धर्मगौडा यांना बळजबरीने उठवले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karnataka SL Dharmegowda Deputy Speaker of Legislative Council found dead suicide note recovered