मोदींच्या सभांनी बदलले चित्र

BJP-narendra-Modi
BJP-narendra-Modi

भाजपला २५ ते ३० जागांवर निर्णायक फायदा
नवी दिल्ली - ‘मतदानोत्तर चाचण्या काहीही सांगोत; पण नरेंद्र मोदी यांची मतदारांवरील ‘जबरदस्त जादू’ कर्नाटकात दिसली...’ भाजपचे कर्नाटक प्रभारी व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी १२ मे रोजी रात्री ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केलेला हा विश्‍वास आज प्रत्यक्षात उतरला. मोदी यांच्या सभांमुळे भाजपला किमान २५ ते ३० जागांवर थेट व निर्णायक फायदा झाल्याचे दिसत आहे. 

कर्नाटकात एक मेपासून मोदींच्या सभांचा धडाका सुरू झाल्यावर वातावरण अक्षरशः पालटले आणि अवघ्या नऊ दिवसांत मोदींचा प्रभाव दिसला. बी. एस. येडियुरप्पांसह मागच्या निवडणुकीत दूर गेलेल्या नेत्यांचे ध्रुवीकरण, भाजप नेतृत्वाचे मायक्रो मॅनेजमेंट आणि मोदींच्या सभा या त्रिसूत्रींचा हा परिणाम आहे.

संघाने भाजपला २२४ पैकी साधारण ९५ ते १०० जागा मिळतील, असे भाकीत मोदींच्या सभांपूर्वी वर्तविले होते. साध्या बहुमतापेक्षाही हा आकडा कमी होता. मात्र, मोदींच्या सभांचा निवडणूक परिणाम व राहुल गांधी याच्या सभांचा राजकीय परिणाम हे बरोबर परस्परविरोधी असतात अशीही उपरोधिक पुस्ती संघसूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना वर्तविली होती.

कर्नाटकाच्या इतिहासात त्या विधानसभेसाठी सर्वाधिक जाहीर सभा घेणारे मोदी पहिले पंतप्रधान ठरले. सभांच्या जोडीलाच त्यांनी दिल्लीतून नमो ॲपद्वारे लोकप्रतिनिधींसह भाजपच्या महिला, युवा व शेतकरी आघाडीच्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला त्याचाही मोठा परिणाम मतदान यंत्रांतून दिसला. राहुल गांधी यांनी संतप्तपणे केलेल्या टीकेला मोदींनी दिलेली ‘नामदार विरुद्ध कामदार’ धर्तीची प्रत्युत्तरे कन्नड जनतेला बऱ्याच अंशी भावली असे जाणकार मानतात. मोदींनी दोन टप्प्यांत ‘मिशन कर्नाटक’ राबविले. पहिल्या टप्प्यात त्यांनी केवळ तीन सभा घेतल्या. त्या वेळी भाजपची स्थिती कठीण होती. एक ते नऊ मे दरम्यान मोदींनी दरदिवशी तीन-चार सभांचा धडाका उडवून दिला व तब्बल १६५ मतदारसंघ कव्हर केले.   
भाजपला मोदींच्या सभांचा लाभ कोठे झाला, या प्रश्‍नाचे गदग, हुबळी-धारवाड व मध्य कर्नाटक वगळता साऱ्याच भागात, असे मिळते. विशेषतः म्हैसूर, केरळच्या धर्तीवर संघाविरुद्धचा हिंसाचार चाललेल्या किनारपट्टी व हैदराबाद कर्नाटकात मोदींच्या सभांनी जोरदार ध्रुवीकरणाला चालना मिळाल्याचे पक्षसूत्रांनी मान्य केले.

प्रादेशिक भावनांना फुंकर
भाजपने येडियुरप्पा व रेड्डी बंधूंना तिकिटे का दिली, यापेक्षा एकीकडे राहुल यांना बालिश ठरवणे व दुसरीकडे सोनिया गांधींचे मूळ मोदींनी पुन्हा उकरून काढले. नेहरूंपासून राजीव गांधींपर्यंतच्या घराणेबाज नेत्यांनी कोणत्या कन्नड नेत्यांना अपमानित केले, हे वर्णन करून त्यांनी राज्यातील मतदाराच्या प्रादेशिक भावनावर फुंकर घातली. केंद्रातील आपल्या सरकारने ठोस काय केले, यापेक्षा जाहीर सभांत मोदींचा जोर कर्नाटक सरकार कसे अपयशी आहे, यावरच राहिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com