पगार कपातीला संतापून कर्मचाऱ्यांकडून iPhone तयार करणाऱ्या कंपनीत तोडफोड

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 12 December 2020

वेतनासंबंधी प्रकरणावरुन कर्मचाऱ्यांनी दगडफेक केली, काचा फोडल्या. गाडी, फर्निचर, कॉम्प्युटर आणि लॅपटॉपचा यात समावेश आहे.

बंगळुरु- बंगळुरु जवळील आयफोनचे उत्पादन करण्याऱ्या कंपनीत संतप्त कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाने मनमानी पद्धतीने वेतन कपात केल्यामुळे तोडफोड केली. हे कर्मचारी विस्ट्रॉन कॉर्पोरेशनसाठी काम करतात. या कंपनीचे तैवान येथे मुख्यालय आहे. पोलिसांनी दिलेल्या सुरुवातीच्या माहितीनुसार, कोलार जिल्ह्यातील नरसापुरा औद्योगिक क्षेत्रातील कंपनीतील कर्मचाऱ्यांनी परिसरात कार उलटवल्या आणि फर्निचरचे मोठे नुकसान केले. 

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, वेतनासंबंधी प्रकरणावरुन कर्मचाऱ्यांनी दगडफेक केली, काचा फोडल्या. गाडी, फर्निचर, कॉम्प्युटर आणि लॅपटॉपचा यात समावेश आहे. कंपनीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिंसक घटनेत अनेक कर्मचाऱ्यांचा समावेश होता. कंपनीकडून या घटनेबाबत आणि वेतन प्रकरणी कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. कामगार संघटनेच्या एका नेत्याने सांगितले की, कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार दिला जात नाही आणि पगार कपातीवरुन हे कर्मचारी चिंतेत आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीत रुजू होण्यापूर्वी जे वेतन देण्याचा दावा करण्यात आला होता. ते दिले जात नसल्याने कर्मचारी नाराज होते. इंजिनिअरला दरमहा 21 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, अचानक त्याचा पगार 16000 करण्यात आला. त्यानंतर पुन्हा त्याच्या वेतनात कपात करुन केवळ 12000 हजार रुपये देण्यात आले. 

हेही वाचा- सॅमसंगच्या निर्णयाने चीनला दणका; भारतात करणार 4825 कोटींची गुंतवणूक

तर इंजिनिअर नसलेल्यांना 8000 रुपये देण्याचे ठरले. एका कर्मचाऱ्याने सांगितले की, आमच्या बँक खात्यात सातत्याने कमी वेतन जमा होऊ लागले. शुक्रवारी रात्री कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनाबाबत व्यवस्थापनाशी चर्चाही केली होती. परंतु, शनिवारी ऑफिसला जाताना हे कर्मचारी संतप्त झाले आणि त्यांनी तो़डफोड सुरु केली. 

विस्ट्रॉन कार्पोरेशन अ‍ॅपलसाठी आयफोन 7, लेनोवो, मायक्रोसॉफ्टसह इतर अनेक आयटी उत्पादने तयार करतात. सुमारे 2900 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 10 हजारांहून अधिक लोकांना रोजगार देण्याच्या प्रस्तावावर विस्ट्रॉनला राज्य सरकारने नरसापुरा औद्योगिक वसाहतीतील 42 एकर जमीन दिली होती. 

हेही वाचा- कुटुंब नियोजनाबाबत कोणावर सक्ती करु शकत नाही, केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात शपथपत्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karnataka Violence erupts at the Wistron iPhone manufacturing unit in Kolar for salary issue