Kashmiri Pandits : चौधरीगुंडचा शेवटचा पंडित जम्मूला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kashmiri Pandits crisis Migration of woman fear of murder jammu

Kashmiri Pandits : चौधरीगुंडचा शेवटचा पंडित जम्मूला

जम्मू : गेल्या काही दिवसांत दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडितांच्या हत्यांच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे, काश्मिरी पंडित मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करीत आहेत. शोपियाँ जिल्ह्यातील चौधरीगुंड गावातील डोली कुमारी या शेवटच्या काश्मिरी पंडित महिलेने गुरुवारी (ता. २७) आपले गाव सोडत जम्मूला स्थलांतर केले.

काश्मीर खोऱ्यात पंडितांच्या हत्या वाढत असल्याने गावातील सर्व सात पंडितांनी जम्मूला स्थलांतर केले होते. त्यानंतर ही एकमेव काश्मिरी पंडीत महिला गावात उरली होती. यासंदर्भात एका इंग्रजी वृत्त वाहिनीशी बोलताना डॉली कुमारी म्हणाल्या की, या भीतीच्या वातावरणात मी आणखी काय करू शकले असते. गावातील सर्व काश्मिरी पंडितांनी गाव सोडल्यानंतरही मी आणखी काही दिवस गावातच राहण्याचा निर्णय घेतला होता. हे माझे घर असून आपले घर कोणाला सोडावेसे वाटेल? प्रत्येकालाच आपले घर प्रिय असते. स्वत:चे घर सोडावे लागत असल्याने मला खूप वाईट वाटत आहे. जर परिस्थिती सुधारली तर मी माझ्या गावी पुन्हा परतेन.

चौधरीगुंड गावात १५ ऑक्टोबरला पंडित पुरणकृष्णन भट यांची त्यांच्या घराबाहेर हत्या करण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वी शोपियाँ जिल्ह्यातील छोटिगाम गावात दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या केली होती. तुमच्या शेजारीच अशा घटना घडल्यानंतर तुम्हाला भीती वाटणार नाही का, असा सवालही डॉली यांनी केला. गावातील काश्मिरी पंडितांची घरे आता कुलूपबंद असून स्वत:च्या बागेतील सफरचंद विकण्यासाठीही ते थांबू शकले नाहीत. त्यामुळे मुस्लिम शेजाऱ्यांवर विश्वास ठेवत मंडईत विकण्यासाठी सफरचंदाची खोकी पंडितांनी गावातच ठेवली आहेत. चौधरीगुंड आणि छोटिपोरा गावांत काश्मिरी पंडितांची ११ कुटुंबे होती. या सर्व कुटुंबांनी जम्मूला स्थलांतर केले आहे.

जिल्हा प्रशासनाकडून स्थलांतराचा इन्कार

हत्येच्या भीतीने काश्मिरी पंडित जम्मूला स्थलांतर करत असल्याचा जिल्हा प्रशासनाने इन्कार केला. काश्मीर खोऱ्यात चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीमुळे आणि सुगीचा हंगाम संपल्याने काश्मिरी पंडित जम्मूला जात असून भीतीमुळे स्थलांतराचे उदाहरण नाही, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

डॉली कुमारी यांच्या भावाने त्यांना गाव सोडून जम्मूला येण्यास सांगितले. गावात पुरण कृष्णन या काश्मिरी पंडिताची हत्या झाल्यानंतर उर्वरित पंडित असुरक्षित वाटत असल्याने स्थलांतर करत आहेत. मात्र, यापैकी कुणीही दहशतवाद सर्वाधिक असतानाही स्थलांतर केले नव्हते.

- गुलाम हसन, गावकरी, चौधरीगुंड