आकाशवाणी काव्य महाकुंभमेळ्यात मायमराठीचा झेंडा!

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 डिसेंबर 2019

कविसंमेलनाचा इतिहास
आकाशवाणीच्या वतीने १९५६ पासून दरवर्षी सादर होणाऱ्या या कविसंमेलनाला स्वतःचा विशिष्ट इतिहास आहे, ओळख आहे. राष्ट्रीय वृत्त विभागांना ग्रहण लागण्याआधी साऱ्या भाषांच्या वृत्त विभागांतर्फे ‘नववर्षाभिनंदन’ नावाचा उपक्रम असाच २०१७ पूर्वी किमान अर्धशतक सादर होत असे. कवितेच्या या महाकुंभमेळ्यात ७२ वर्षांत देशातील बहुतांश नामवंत कवींनी हजेरी लावलेली आहे. अमृता प्रीतम, रामधारीसिंह दिनकर, हरिवंशराय बच्चन, बशीर नद्र, निदा फाजली, शहरयार, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आदी नामवंत कवींनी या संमेलनात उपस्थिती दर्शविली आहे.

नवी दिल्ली - पालखी आणू नका दारात माझ्या। संत सारे नांदती देहात माझ्या।। ...अस्सल मराठीत सादर होणाऱ्या कवितेला विविध भाषांतील कवी आणि रसिकांकडून मुक्तपणे पावती मिळत होती आणि कवितावाचन संपताक्षणी बहुसंख्य श्रोत्यांनी उत्स्फूर्तपणे उभे राहून टाळ्यांचा गजर करीत जणू मायमराठीलाच दाद दिली... निमित्त होते आकाशवाणीच्या राष्ट्रीय सर्वभाषा कविसंमेलनाचे आणि मराठी कविता सादर करीत होते ज्येष्ठ कवी, गझलकार प्रदीप निफाडकर. येत्या २६ जानेवारीला सर्व रेडिओ केंद्रांवरून या संमेलनाचे प्रसारण केले जाणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आकाशवाणीने नव्यानेच उभारलेल्या ‘आरंभ रंगभवन’ या देखण्या सभागृहात प्रथमच झालेल्या यंदाच्या कविसंमेलनाला ज्येष्ठ साहित्यिक डॉ. चित्रा मुद्गल, राजशेखर व्यास प्रमुख पाहुणे होते. पंजाबीचे दर्शनसिंग भुत्तर (पतियाळा) यांनी नदी व नारी यांची रूपे सांगणारी, नेपाळी कवी भवीलाल लामी छाने यांनी ईशान्य भारतातील दहशतवादाचे उग्र रूप दाखविणारी, केरळचे पी. रमण यांनी मानवी मनाच्या पाखराची तडफड सांगणारी, विजयनाथ झा यांनी राष्ट्रभक्ती व राष्ट्रवादाचे सूर  आळवणारी कविता सादर केली.

आणखी वाचा - मायवतींच्या एका निर्णयाने काँग्रेसची पंचाईत; सरकार धोक्यात

त्यांनाही जोरदार दाद मिळाली. निफाडकर यांनी आपला इतका संक्षिप्त परिचय दिला होता की सूत्रसंचालक राजीव शुक्‍ला यांनीही त्याचा विशेष उल्लेख केला. पंजाबमधील हिंसाचाराच्या काळात जन्माला आलेल्या या कवितेत निफाडकर यांनी वेळोवेळी हिंदीत संवाद साधल्याने उपस्थितांना कवितेची मर्मस्थाने नेमकी कळण्यास मदत झाली. ‘‘त्या विमानाचे कळेना काय झाले, हा पहा आला तुक्‍या गावात माझ्या’’ यासारख्या ओळींना प्रचंड दाद मिळाली. कविता संपवून निफाडकर खाली बसले तरी टाळ्यांचा गजर सुरूच होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kavisammelan in aarambh rangbhavan