सिंहगर्जनेतून तेलंगणाची निर्मिती, आता KCR यांची डरकाळी देश बदलणार का?

सिंहगर्जनेतून तेलंगणाची निर्मिती, आता KCR यांची डरकाळी देश बदलणार का?
Summary

देशाला बदलाची गरज असल्याचं सांगत त्यांनी आम्ही लवकरच हैदराबादमध्ये किंवा इतर ठिकाणी भेटू आणि पुढची दिशा ठरवू असं म्हटलं.

नवी दिल्ली - तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर (KCR) यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. देशाला बदलाची गरज असल्याचं सांगत त्यांनी आम्ही लवकरच हैदराबादमध्ये किंवा इतर ठिकाणी भेटू आणि पुढची दिशा ठरवू असं म्हटलं. तसंच देशात एक आंदोलन उभारू असंही केसीआर म्हणाले. देशात २०१४ च्या निवडणुकीत भाजपने एकहाती विजय मिळवला. त्यानंतर २०१९ मध्येही केंद्रात पुन्हा भाजपची सत्ता आली. यानंतर भाजपला विरोध करणाऱ्या इतर पक्षांनी एकत्र येत तिसरी आघाडी उघडली. यात देशातील अनेक दिग्गज नेत्यांनी गेल्या काही काळात एकाच मंचावर उपस्थिती लावली. दरम्यान, यात तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या केसीआर यांनी देशाचं राजकारण बदलण्याची गरज असल्याचं म्हटल्यानंतर यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

केसीआर यांच्यामागे किती राजकीय ताकद आहे? सध्याच्या घडीला देशात भाजप मजबूत पक्ष आहे. तर केसीआर यांच्याकडे लोकसभेत ९ आणि राज्यसभेत ६ खासदार आहेत. तर राज्यात १३६ आमदारांचे संख्याबळ आहे. केसीआर यांच्या ताकदीपेक्षा त्यांची चिवट अशी जिद्द आणि तेलंगणाच्या निर्मितीवेळी त्यांनी साधलेली किमया या दोन्ही गोष्टीच्या जोरावर इतिहास रचला आहे. राष्ट्रीय राजकारणात नसले तरी केसीआर यांनी तेलंगणाची निर्मिती करण्यामध्ये त्यांनी प्रमुख अशी भूमिका बजावली. याच केसीआर यांनी महाराष्ट्रात येऊन इथल्या मुख्यमंत्र्यांसह राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानं चर्चा झाली नाही तर नवलच.

सिंहगर्जनेतून तेलंगणाची निर्मिती, आता KCR यांची डरकाळी देश बदलणार का?
उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर केसीआर यांनी घेतील शरद पवारांची भेट

देशात जून २०१४ ला तेलंगणा राज्याची स्थापना झाली आणि यासह ते देशातील २९ वे राज्य ठरले. राज्याच्या स्थापनेनंतर निवडणूक झाली आणि मुख्यमंत्री पदी केसीआर विराजमान झाले. केसीआर म्हणजे कल्वकुंतला चंद्रशेखर राव. नवं राज्य स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणं एवढीच त्यांची ओळख आहे का? तर नाही. त्याआधी त्यांनी अनेकदा राजकारणात धक्कादायक असे निर्णय घेतले आणि इतरांना धक्काही दिला. लोकप्रिय घोषणा कऱणं, विरोध म्हणून खासदारकीचा राजीनामा देणं असो किंवा पोटनिवडणुकीत निवडून येणं असो, केसीआर यांचा हात कुणीही धरत नसे.

तेलंगणाच्या निर्मितीचं आंदोलन

तेलंगणा राज्याची निर्मिती २ जून २०१४ रोजी झाली आणि केसीआर यांचे नाव राज्याच्या इतिहासात अजरामर झाले. स्वतंत्र तेलंगणा राज्याचं आंदोलन जवळपास १५ वर्षे सुरु होतं. ते फक्त सुरु केलं किंवा चालवलं असं नाही तर आंदोलनाचा शेवट यशस्वीही करून दाखवला. विशेष म्हणजे इतिहास, साहित्य आणि संगीत या तीन मुद्द्यांच्या जोरावर त्यांनी स्वतंत्र राज्यासाठी आंदोलन केलं. आंदोलन करत असताना केसीआर उगाच विरोध म्हणून लगेच रस्त्यावर उतरण्याची घाई करतात असं नाही. ज्या गोष्टीला विरोध करायचा आहे त्याचा अंदाज घेऊन त्यानंतरच ठोस पावलं टाकतात असं त्यांची एकूण राजकीय कारकिर्द पाहता वाटतं. काँग्रेसपासून वेगळं होण्याचा घेतलेला निर्णय, तेलगु देसम पक्षाला रामराम आणि तेलंगणासाठीचं आंदोलन यात त्यांनी त्यांचे निर्णय चुकीचे ठरू दिले नाहीत.

सिंहगर्जनेतून तेलंगणाची निर्मिती, आता KCR यांची डरकाळी देश बदलणार का?
गोष्टी खोट्या पद्धतीनं सांगण्याचा उद्योग बंद व्हायला हवा - मुख्यमंत्री

१९९६ मध्ये तत्कालिन पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी स्वातंत्र्य दिनी देशाला संबोधित करताना उत्तराखंडला स्वतंत्र राज्याची मान्यता देण्याचे संकेत दिले. त्याच काळात हैदराबादमध्ये आयटी इंडस्ट्री विकसित होत होती. जागतिकीकरणामुळे व्यापार वाढत होता. त्यामुळे आंध्रच्या सीमेवरील लोकांचे हैदराबादमध्ये येणे-जाणे वाढले. नेमकी हिच गोष्ट केसीआर यांनी हेरली. त्याच वर्षी १ नोव्हेंबर रोजी तेलगु भाषेचे प्रचारक आणि तेलंगणाचे पुरस्कर्ते प्राध्यपक जयशंकर यांनी काही लोकांसमवेत वारंगलच्या अन्य एका छोट्या हॉलमध्ये बैठक आयोजित केली. त्या बैठकीला कमीत कमी ५ हजार लोक हजर होते. पुढे अशा बैठका सतत होत राहिल्या.

टीआरएसची स्थापना

दुसऱ्या बाजुला २००० मध्ये आंध्रप्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने वीज दरात वाढ केली. तेव्हा केसीआर यांनी आपल्याच पक्षाला एक पत्र लिहिले होते. त्यावर्षी नोव्हेंबरमध्ये उत्तराखंड, झारखंड आणि छत्तीसगढ या राज्यांची स्थापना झालेली. एकूणच राज्याच्या निर्मितीसाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचा अंदाज केसीआर यांना आला. त्यातच तीन वर्षांच्या बैठकांमुळे लोकांचा पाठिंबा वाढत चालला होता आणि स्वतंत्र तेलंगणा राज्य मिळवणे ही अशक्य गोष्ट नसल्याचं केसीआर यांच्या लक्षात आलं. तेव्हा केसीआर यांनी जेष्ठ नेते इनय्या, जयशंकर आणि तेलंगणाच्या अन्य समर्थकांशी सविस्तर चर्चा केली आणि २७ एप्रिल २००१ ला तेलंगणा राष्ट्र समितीची (TRS) स्थापना करून लढा आणखी तीव्र केला.

KCR
KCR

केसीआर यांची सिंहगर्जना

पक्षाच्या स्थापनेनंतर २० दिवसांनी म्हणजे १७ मे रोजी करीमनगरमध्ये केसीआर यांनी 'सिंहगर्जना' सभेचे आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी घोषणा केली की, "मी रक्ताचा एकही थेंब न सांडता, केवळ राजकीय आंदोलनातून तेलंगणाची स्थापना करुन दाखवेन.'' आंदोलनाची सुरुवात केल्यानंतर आपण तेलंगणा राज्याचे आंदोलन सुरु केले तरी इतिहासाशिवाय ते लोकांचे आंदोलन बनू शकत नाही हे केसीआर यांना माहिती होतं. तेलंगणा आणि तेलगू भाषेचा इतिहास हीच त्यांची ताकद बनली. राज्याच्या कानाकोपऱ्यात जावून ते इतिहास आणि समाजाशी जोडलेल्या गोष्टी सांगून लोकांचा पाठिंबा मिळवू लागले. यासाठी त्यांनी तेलगु साहित्याचाही वापर केला.

सिंहगर्जनेतून तेलंगणाची निर्मिती, आता KCR यांची डरकाळी देश बदलणार का?
महाराष्ट्रातून निघालेला मोर्चा यशस्वी होतोच; केसीआर यांचा इशारा

स्वत: गाणी लिहून गायली

केसीआर हे आज मुख्यमंत्री आहेत, गेल्या कित्येक वर्षांपासून सक्रीय राजकारणात आहेत. मात्र त्याआधी ते साहित्य या विषयातले पदवीधरही आहेत. 'तेलंगाना वाले जागो, आंध्र वाले भागो' यांसारख्या घोषणाही त्यांनी लिहिल्या. स्वातंत्र्य लढ्याची ज्योत पेटवण्यासाठी त्यांनी गाण्यांचा वापर केला. तेलंगणाची स्वतंत्र निर्मिती व्हावी यासाठी त्यांनी स्वत: गाणी लिहिली. इतकंच काय तर जनआंदोलन उभारण्यासाठी त्यांनी ही गाणी स्वत:च गायली. जसजशी लोकप्रियता वाढायला लागल्यानंतर गाण्यांची रचना नीट करून घेतली. ती गाणी लोकांपर्यंत पोहोचवली आणि तेलंगणाच्या आंदोलनात लाखो लोकांचा पाठिंबा मिळवला.

KCR
KCR

राज्यानंतर देशात यश मिळणार का?

तेलंगणाच्या निर्मितीसाठी दिवसरात्र झटलेल्या केसीआर यांनी त्यांची राजकीय ताकदही वाढवण्याकडे लक्ष दिले. यासाठी त्यांनी कधी काँग्रेसशी हातमिळवणी केली तर कधी एनडीएला साथ दिली. केंद्रात डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळातही काही काळ काम केलं. मात्र तिथेही त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. तेलंगणाच्या निर्मितीनंतर पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार, तसंच तेलंगणाचा पहिला मुख्यमंत्री दलित असेल अशी आश्वासनेही त्यांनी दिली होती. अर्थात राज्याच्या निर्मितीनंतर त्यांनी दिलेली आश्वासनेही हवेत विरली. एखादं आंदोलन हातात घेतलं तर ते यशस्वी करायचंच या निर्धाराने मैदानात उतरणाऱ्या केसीआर यांनी यावेळी देश बदलण्यासाठी कंबर कसली आहे. केंद्रातील मोदी सरकारला सत्तेतून हटवण्यासाठी त्यादृष्टीने मोर्चेबांधणी देशात तिसरी आघाडी एकत्र येऊन करत आहेत. त्यातच आता केसीआर यांनी सुरु केलेल्या या प्रयत्नांना कितपत यश मिळतं हे येणारा काळच ठरवेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com