VIDEO - हत्तीच्या पिलाचा पहिला बड्डे; सेलिब्रेशनसाठी आले 15 हत्ती

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

एका हत्तीच्या पिलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या पहिल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ आहे.

तिरुवनंतपुरम - केरळमधील एका हत्तीच्या पिलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या पहिल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ आहे. श्रीकुट्टी असं त्या हत्तीच्या पिलाचं नाव आहे. रविवारी केरळमधील कोट्टूर हत्ती पुनर्वसन केंद्रामध्ये त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला इतर 15 हत्ती आणि काही लोक हजर होते. फक्त दोन तीन आठवड्यांच्या श्रीकुट्टीला एका जंगलातून जखमी अवस्थेत पुनर्वसन केंद्रात आणण्यात आलं होतं. 

श्रीकुट्टी किती दिवस जिवंत राहिल हे सांगता येत नव्हतं मात्र , कोट्टुर इथं मुख्य पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. ई इश्वरन यांनी श्रीकुट्टीची खास काळजी घेतली. केळी, नारळपाणी यांसारखा पोषक आहार आणि देखभाल केल्यानं श्रीकुट्टी तंदुरुस्त झाली. 
पुनर्वसन केंद्रात श्रीकुट्टीची चांगली देखभाल करण्यात आली. त्यामुळेच ती वाचू शकली. ती फक्त वाचलीच असं नाही तर वाढही नीट होत आहे. श्रीकुट्टीचा वाढदिवस त्यामुळे इतरांसाठी खास होता. तसंच या वाढदिवसासाठी मोठा केकही तयार करण्यात आला होता.

पहिल्या वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. यामध्ये डॉक्टर इश्वरनसुद्धा सोबत दिसत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर एका युजरनं म्हटलं की, श्रीकुट्टीच्या दुसऱ्या वाढदिवसाला आम्हीसुद्धा सहभागी होऊ. तेव्हा कोरोना असुदे किंवा काही असेल आम्ही आतापासून प्लॅनिंग करत आहे. 

हे वाचा - प्रेरणादायी! अपंग असूनही 10 वर्षांचा मुलगा खेळतोय फुटबॉल

श्रीकुट्टीने वाढदिवसाला डोक्यावर पिवळ्या रंगाचं फूल लावलं होतं असंही एका युजरनं म्हटलं आहे. वाइल्डलाइप वॉर्डन सतिशन एनव्ही यांनी म्हटलं की, श्रीकुट्टी जेव्हा सापडली होती तेव्हा तिच्या एका पायला गंभीर जखम झाली होती. संपूर्ण शरीरावर जखमांचे व्रण होते. पाण्याच्या वेगवान प्रवाहामध्ये ती वाहून आल्यानं आई-वडिलांपासून वेगळी झाली असण्याची शक्यता आहे. त्यावेळी किमान तीन एक आठवड्याची होती आणि वाचण्याची शक्यता फक्त 40 टक्के होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kerala baby-elephant-celebrated-her-first-birthday video