केरळच्या फळांना यूएईत "नो एंट्री' 

पीटीआय
गुरुवार, 31 मे 2018

निपाह विषाणूच्या प्रसाराची धास्ती; कोलकत्यात एका संशयिताचा मृत्यू 

नवी दिल्ली - निपाह विषाणूपासून खबरदारीचे उपाय म्हणून यूएई सरकारने केरळहून भाजीपाला आणि फळांच्या आयातीवर बंदी घातली आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने केरळहून कोणत्याही प्रकराचे फळ किंवा भाजीपाला मागवण्यास मनाई केली आहे. दरम्यान, कोलकता येथे एका जवानाचा मृत्यू झाला असून, त्याला निपाह विषाणूची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

संयुक्त अरब अमिरातीने मंगळवारी निपाह विषाणूच्या प्रसारामुळे केरळहून फळे आणि भाजीपाला आयात करण्यावर बंदी घातली आहे. केरळमध्ये निपाहचे 13 बळी गेले आहेत. भारतातही अनेक राज्यांत आरोग्य सजगतेचा इशारा दिला आहे. यात जमिनीवर पडलेले किंवा पक्ष्यांच्या दातांच्या खुणा असलेले फळ खाण्यास मनाई करण्यात आली आहे. यूएई मंत्रालयाच्या मते, वटवाघळांनी खाल्लेल्या फळापासून निपाह विषाणूचा प्रसार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आंबा, केळी ही वटवाघळाची आवडती फळे आहेत. यातूनच विषाणूचा प्रसार होत असल्याचे सांगितले जात आहे. निपाह विषाणूमुळे मेंदूविकार होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसे पाहिले तर भारतात आतापर्यंत या विषाणूचा शोध लागलेला नाही आणि संशोधन सुरू आहे. दक्षिणेतील पेरांबरा येथे निपाहचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्याठिकाणी नमुन्याची सातत्याने तपासणी केली जात आहे. निपाह विषाणूवर अद्याप कोणताही उपचार सापडलेला नाही. 

कोलकत्यात जवानाचा मृत्यू 
केरळमधील एका जवानाचा कोलकता येथे मृत्यू झाला असून, तो निपाह विषाणूचा संशयित असल्याचे सांगितले जात आहे. सीनू प्रसाद (वय 27) असे त्याचे नाव असून, तो 20 मेपासून दवाखान्यात उपचार घेत होता. सीनूची नियुक्ती कोलकता येथील फोर्ट विल्यम येथे झाली होती. तो केरळमधून महिनाभराच्या सुटीनंतर आला होता आणि 13 मे रोजी कामावर रुजू झाला. मात्र, त्याला लष्कराच्या कमांड रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच दिवसांच्या उपचारानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे लष्कराच्या प्रवक्‍त्याने सांगितले. त्याला निपाह विषाणूची लागण झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, त्याच्या रक्ताचे नमुने पुण्याच्या विषाणूशास्त्र प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

Web Title: Kerala fruit No Entry in UAE