
मंदिरातील पूजा, कार्यक्रम आणि समारंभांमध्ये राजकीय भूमिका असू शकत नाही.
Kerala High Court : धार्मिक कार्यक्रमात कोणता रंग वापरायचा? वादावर High Court चं मोठं भाष्य
Kerala News : मंदिर आणि पोलीस प्रशासन यांच्यातील वादावर केरळ उच्च न्यायालयानं (Kerala High Court) आज (गुरुवार) मोठं भाष्य केलं.
कोणत्याही मंदिराच्या समारंभांत केवळ राजकीयदृष्ट्या तटस्थ रंगांचा वापर केला जाईल, असा दबाव जिल्हा प्रशासन आणि पोलिसांवर आणता येणार नाही, असं न्यायालयानं म्हटलंय.
भद्रकाली देवी मंदिराच्या (Bhadrakali Devi Temple) त्रावणकोर देवस्वोम बोर्डानं (Travancore Devaswom Board) प्रशासनाच्या आदेशाला केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिलं. कलियुत्तू उत्सवाच्या सजावटीसाठी केवळ भगव्या रंगाला (Saffron Color) परवानगी देता येणार नाही, असं प्रशासनानं मंदिर मंडळाला सांगितलं होतं. यासंदर्भात दाखल झालेल्या दोन याचिकांवर उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
या याचिकांवर न्यायालयानं म्हटलं की, 'मंदिरातील पूजा, कार्यक्रम आणि समारंभांमध्ये राजकीय भूमिका असू शकत नाही. भगवा वापरण्यासाठी मंदिर चालवणाऱ्या मंडळावर दबाव आणण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार उपासक किंवा भक्तांना नाही. तसंच, मंदिराच्या कार्यक्रमांमध्ये राजकीय तटस्थ रंगाचा वापर करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस दबाव आणू शकत नाहीत.'
परंपरा आणि श्रद्धेनुसार मंदिरातील कलियुत्तू उत्सवासाठी कोणता रंग वापरायचा हे त्रावणकोर देवस्वोम बोर्ड ठरवेल, असंही न्यायालयानं नमूद केलं. मंदिर परिसरात किंवा आजूबाजूला काही गैरप्रकार घडू शकतात, त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते, अशी भीती असल्यास मंदिर मंडळ पोलिसांना कळवू शकतं, अशीही टिप्पणी न्यायालयानं केली.