
NCP News: राष्ट्रवादीच्या माजी खासदाराला कोर्टाचा दिलासा; १० वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेला स्थगिती
NCP News: राष्ट्रवादीच्या लक्षद्वीपवरील माजी खासदाराला खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र केरळ उच्च न्यायालयाने मोहम्मद फैजल यांना दिलासा देत हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी 10 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.
फैजल यांच्या भावासह या प्रकरणातील अन्य तीन दोषींनाही न्यायालयाने दिलासा दिला आहे. दरम्यान लक्षद्वीप प्रशासनाने मोहम्मद फैजलच्या शिक्षेला स्थगिती देण्यास विरोध केला होता, कारण त्यांना दिलासा दिल्याने लोकांच्या मनात न्याय प्रक्रियेवरील विश्वास उडेल असं सांगण्यात आलं होतं.
काय आहे प्रकरण?
फिर्यादीनुसार, खासदाराने कथितपणे लोकांच्या गटाचे नेतृत्व केले आणि वादानंतर माजी केंद्रीय मंत्री पीएम सईद यांचे जावई मोहम्मद सलिया यांना गंभीर मारहाण करून जखमी केले. त्यानंतर फैजल आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहितेअंतर्गत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
काँग्रेस नेते मोहम्मद सलिया यांना नंतर केरळला नेण्यात आले आणि त्यांच्यावर अनेक महिने खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या खटल्यात एकूण 32 आरोपी होते आणि पहिल्या चार जणांना शिक्षा झाली होती.
खासदार हे या प्रकरणातील दुसरे आरोपी होते. मात्र, ही किरकोळ बाचाबाची असल्याचे आरोपींच्या वकिलांनी ठामपणे सांगितले.