esakal | पत्रकार कप्पानला आईच्या भेटीसाठी 5 दिवसांचा जामीन; 'हाथरस' रिपोर्टींगवेळी अटकेत
sakal

बोलून बातमी शोधा

siddique kappan

हाथरस सामुहीक बलात्कार प्रकरणाचे रिपोर्टींग करण्यासाठी गेलेल्या काही पत्रकारांना अटक करण्यात आली होती.

पत्रकार कप्पानला आईच्या भेटीसाठी 5 दिवसांचा जामीन; 'हाथरस' रिपोर्टींगवेळी अटकेत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सामुहीक बलात्कार प्रकरण घडले होते. या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. उत्तर प्रदेश सरकारकडून या घटनास्थळी कुणालाही जाऊ दिलं जात नव्हतं. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांना देखील संबंधित स्थळी जाताना पोलिसांशी संघर्ष करावा लागला होता. या प्रकरणाचे रिपोर्टींग करण्यासाठी गेलेल्या काही पत्रकारांना अटक करण्यात आली होती. यातीलच एक पत्रकार सिद्दीक कप्पान याच्या अटकेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या 'केरळ युनियन ऑफ वर्कींग जर्नालिस्ट'च्या याचिकेवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी सुनावणी केली आहे. 

हेही वाचा - 'ते' घाबरलेत, देश नाही; दिशा रवीच्या अटकेवरुन राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

आता सिद्दीक कप्पानला सुप्रीम कोर्टाने पाच दिवसांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आपल्या 90 वर्षीय वृद्ध आणि आजारी आईला भेटण्यासाठी म्हणून काही अटींसह हा जामीन देण्यात आला आहे. यामध्ये केरळला जाऊन त्याला आईला भेटता येईल. मात्र, त्याला मीडियाशी बोलता येणार नाही अथवा सोशल मीडियावर व्यक्त होता येणार नाही. तसेच नातेवाईक आणि डॉक्टर सोडून त्याला इतर कुणालाही भेटता येणार नाही. त्याला उत्तर प्रदेश पोलिसांकरवी केरळपर्यंत नेण्यात येईल. त्याला नेऊन आणण्याची संपूर्ण जबाबदारी उत्तर प्रदेश पोलिसांची असणार आहे. 

गेल्या महिन्यात आपल्या आईशी व्हिडीओ कॉलवर  बोलण्याची परवानगी  कोर्टाकडून मिळाली होती.  कप्पन याच्यासह आणखी तीन पत्रकारांच्या संशयास्पद वाटल्याने त्यांना हाथरस प्रकरणी रिपोर्टींग करताना दहशतवादाच्या कायद्याखाली अटक करण्यात आली होती. FIR मध्ये नोंदवल्याप्रमाणे बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्याच्या कायद्याखाली ही अटक झाली आहे. दहशतवादी कृत्यासाठी फंड गोळा करण्याच्या आरोपाखाली कप्पन याच्यासह आणखी तिघे मथुरामधील तुरुंगात अटकेत आहेत.