केरळमध्ये ऑरेंज ॲलर्ट; प्रशासनाकडून खबरदारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केरळमध्ये ऑरेंज ॲलर्ट; प्रशासनाकडून खबरदारी

केरळमध्ये ऑरेंज ॲलर्ट; प्रशासनाकडून खबरदारी

तिरुअनंतपुरम/चेन्नई : तमिळनाडूपाठोपाठ आता केरळमध्ये सहा जिल्ह्यात ऑरेंज ॲलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या तीन दिवसांत म्हणजे १६ डिसेंबरपर्यंत केरळमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. इडुक्कीच्या जिल्हाधिकारी शिबा जॉर्ज यांनी म्हटले की, अनेक जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिल्याने इडुक्की जिल्ह्यातील चेरुथनी येथील बंधाऱ्याचे दरवाजे कधीही उघडले जाऊ शकतात.

तमिळनाडूत दोन आठवड्यांपासून पडणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळित झाले. मात्र आता केरळमध्ये पावसाची धोक्याची घंटा वाजली आहे. हवामान खात्याने केरळमध्ये ऑरेंज ॲलर्ट जारी केला आहे. त्यात सहा जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. गेल्या चार दिवसांत तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या काही भागात मुसळधार पाऊस पडला. आता केरळमध्ये रविवार ते मंगळवारपर्यंत पावसाचा अंदाज आहे. केरळमधील तिरुअनंतपुरम, कोल्लम, पठानमथिट्टा, अलपुझ्झा, कोट्ट्याम, एर्नाकुलम आणि इडुक्की पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचवेळी अंदमान आणि निकोबार येथेही पंधरा नोव्हेंबरला विविध ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. दरम्यान, तमिळनाडूत मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी काल चेंगलपट्टू आणि कांचीपुरम येथील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी काही लोकांबरोबर चहा देखील घेतला आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. पूरग्रस्त भागातील चिखल आणि घाण लवकरात लवकर काढण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आणि सूचना केल्या.

मृतांच्या नातेवाइकांना चार लाख

तमिळनाडूत पावसाने थैमान घातल्यामुळे मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मदतकार्याला वेग आला आहे. पावसामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना तमिळनाडू सरकारकडून प्रत्येकी चार लाख रुपये देण्यात येणार आहेत. राज्यात एकूण १२ जणांचा मृत्यू झाल्याचे महसूल विभागाने सांगितले. पाणी साचल्यामुळे सर्वत्र डासांचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी वीज नसून पाणीपुरवठा देखील बंद आहे.

loading image
go to top