

Khade Hanuman Viral Video
sakal
उज्जैन : सिंहस्थ २०२८च्या तयारीसाठी सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे सती गेट परिसरातील ‘खडे हनुमान’ मंदिर चर्चेत आले आहे. मंदिरातील मूर्ती हटवण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला; मात्र मूर्ती हलली नाही, अशा बातम्या आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले. या चर्चेनंतर उज्जैन प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मूर्ती हलवण्यासाठी आतापर्यंत कोणतीही यंत्रसामग्री किंवा मानवी शक्ती वापरण्यात आलेली नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
उज्जैनचे उपविभागीय दंडाधिकारी लक्ष्मी नारायण गर्ग यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेल्या या बातम्या दिशाभूल करणाऱ्या असल्याचे सांगितले. मूर्ती हटवण्यासाठी क्रेन, कटर किंवा अन्य यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आलेला नाही. त्यामुळे समाजमाध्यमांवरील अपुऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.